Lakhat Ek Amcha Dada Fame Nitish Chavan Hotel : मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी स्वत:चे नवीन व्यवसाय सुरू केले आहेत. ‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेता नितीश चव्हाणने देखील २०२४ मध्ये व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्याचं साताऱ्यात हॉटेल आहे, अभिनेत्याने त्याच्या हॉटेलची झलक नुकतीच सोशल मीडियावर शेअर केली आहे.
‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत लोकप्रिय अभिनेता नितीश चव्हाण सूर्या दादाची मुख्य भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील काही कलाकारांनी सूर्या दादाच्या हॉटेलला भेट दिली होती. नितीशने १ मार्च २०२४ रोजी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत तो ‘लघु नाष्टिका’ सुरू करत असल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली होती.
नितीश चव्हाणच्या हॉटेलचं नाव आहे ‘आजोळ – चव मामाच्या गावाची’. अभिनेत्याचं हे हॉटेल साताऱ्यातील शाहू चौकात आहे. याठिकाणी सगळे मराठमोळे पदार्थ सर्व्ह केले जातात. मिसळ पाव, साबुदाणा खिचडी, पोहे या पदार्थांचा आस्वाद खवय्यांना हा हॉटेलमध्ये घेता येणार आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री ईशा संजयने या हॉटेलला भेट दिली होती. ती ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत राजश्री जगताप ही भूमिका साकारत आहे.
सूर्या दादाच्या हॉटेलला भेट दिल्यावर ईशाने खास फोटो शेअर केला होता. यावर अभिनेत्रीने “आमच्या दादाचं आणि आमच्या हक्काचं” असं कॅप्शन दिलं होतं.

दरम्यान, नितीश चव्हाणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत तो सूर्यकांत जगताप ही भूमिका साकारत असून सिरियलमध्ये सूर्या दादा त्याच्या चारही बहिणींचं सदैव रक्षण करताना दिसतो. यामध्ये त्याच्यासह गिरीश ओक, मृण्मयी गोंधळेकर, कोमल मोरे, जुई तनपुरे, ईशा संजय, समृद्धी साळवी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय यापूर्वी अभिनेता नितीश चव्हाणने ‘लागिरं झालं जी’ या गाजलेल्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.