Lakshmi Niwas : भावनाच्या गळ्यात गुपचूप मंगळसूत्र घालणारा हा दुसरा-तिसरा कोणी नसून सिद्धू असतो. हे सत्य अद्याप भावनाला समजलेलं नाहीये. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती प्रचंड अस्वस्थ असते. यामुळेच श्रीनिवास तिला काही दिवस जान्हवीच्या घरी राहायला पाठवतात. पण, तिथेही भावनाचं मन रमत नाही.
दुसरीकडे, सिद्धूला लवकरात लवकर भावनासमोर आपलं मन मोकळं करायचं असतं. पण, भावना खरी परिस्थिती ऐकल्यावर काय निर्णय घेईल, ती नवरा म्हणून सिद्धूचा स्वीकार करेल की नाही, गाडेपाटील कुटुंबीय भावनाचा आणखी अपमान करणार या सगळ्या गोष्टींचा विचार करून सिद्धूला प्रचंड भीती वाटत असते. अशातच स्वत:च्या स्वार्थापोटी रवी आणि सुपर्णा छोट्या आनंदीला पार्टीला घेऊन जातात.
आनंदी पार्टीला आल्यावर सर्व पाहुण्यांसमोर रवीने जबरदस्ती इथे आणलंय असं माइकवर सांगते. यामुळे रवी आणि सुपर्णाची चांगलीच फजिती उडते. इतकंच नव्हे तर वकील सुद्धा यापुढे तुम्हाला आनंदीची कस्टडी व पैसे मिळणार नाहीत असं सांगतात. यामुळे चिडलेले रवी-सुपर्णा मोठा कट रचतात.
वेटरची मदत घेऊन सुपर्णा भावनाच्या ज्युसमध्ये नशेची पावडर आणि दारू मिसळते. यानंतर भावना तोच ज्युस पिते आणि काही वेळातच वेड्यासारखी वागू लागते. भावनाला पाहून सिद्धूला नक्कीच काहीतरी गडबड असल्याचा अंदाज येतो. भावनाच्या हातातील ग्लास काढून घेत तो चेक करतो. यानंतर भावनाला कोणीतरी दारू पाजल्याचा अंदाज सिद्धूला येतो.
भावनाला अशा परिस्थितीत एकटं सोडून जाणं सिद्धूच्या मनाला पटत नसतं. त्यामुळे तो तिला जमेल तेवढी मदत करतो. सिद्धूशी नेहमीच खोचकपणे वागणारी भावना यावेळी नशेत त्याचं कौतुक करते. “तुम्ही खूप चांगले आहात सिद्धीराज नाहीतर काही माणसं भ्याड असतात… गळ्यात मंगळसूत्र घालून निघून जातात.” भावनाच्या मनातील दु:ख पाहून सिद्धूला वाईट वाटतं. तो काही करून भावनाची जबाबदारी स्वीकारायची असा निर्णय घेतो.
याशिवाय, “मॅडम तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घालणारा मीच होतो” असंही तो या प्रोमोमध्ये भावनाला सांगत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, भावना या दरम्यान नशेत असल्याने खरंच सिद्धूने दिलेली कबुली तिच्या लक्षात राहील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा हा विशेष भाग १७ मे २०२५ रोजी प्रसारित केला जाणार आहे.