Lakshmi Niwas Fame Actress : ‘झी मराठी’च्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ही कौटुंबिक मालिका रोज एक तास प्रसारित केली जाते. भावना, लक्ष्मी, सिद्धू, जान्हवी, श्रीनिवास, वेंकी अशा या मालिकेतील सगळ्याच पात्रांनी आता प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या मोठ्या मुलीची म्हणजेच ‘मंगला’ ही भूमिका अभिनेत्री स्वाती देवल साकारत आहे. आजवर स्वातीने विविध मालिकांमध्ये काम केलेलं आहे. मात्र, आता ही लोकप्रिय अभिनेत्री एका हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबद्दल स्वातीने स्वत:च पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
अभिनेत्री स्वाती देवल ‘कलर्स’ हिंदी वाहिनीवरील ‘मनपसंद की शादी’ या मालिकेत झळकणार आहे. आता या नव्या मालिकेत स्वाती कोणती भूमिका साकारणार हे लवकरच स्पष्ट होईल.
स्वाती देवल पोस्ट शेअर करत म्हणाली, “नवनवीन भूमिकांमधून तुम्हाला मी नेहमीच भेटायला येते. स्वराध्य झाल्यापासून मराठीत काम केलंच नव्हतं… अनेक हिंदी मालिका करत गेले. आता पुन्हा त्या लिस्टमध्ये एका नव्या नावाची आणि भूमिकेची भर पडत आहे. लवकरच Colors हिंदी Television वाहिनीवरून तुम्हा सर्वांना एका वेगळ्या भूमिकेतून भेटायला सज्ज झाले आहे. ‘मनपसंद की शादी’ या नव्या शोमधून… अतिशय गाजलेल्या, मोठ्या आणि नावाजलेल्या Production मधून म्हणजेच ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’ आणि ‘हम साथ साथ है’सारख्या चित्रपटांचे निर्माते हा नवीन Television Show भेटीस घेऊन येत आहेत… ओळखा पाहू कोण?? लवकरच तारीखही कळवते… आणि हो या हिंदीमालिकेसह मी ‘लक्ष्मी निवास’सारख्या उत्तम मालिकेतही काम करत राहणार आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना सोडून दूर जाणार नाहीच.. तरी सर्वांनी या माझ्या नव्या हिंदी मालिकेलाही भरभरून प्रतिसाद द्या… आणि असेच पाठीशी आशीर्वाद राहू द्या!”
दरम्यान, स्वाती देवलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर यापूर्वी अभिनेत्री ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘सुख कळले’ अशा बऱ्याच लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे.