Tanvi Kolte praises co actor Anuj Thakare: ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत अनेक कलाकार काम करताना दिसतात. मालिकेतील सर्वच पात्रे वेगवेगळ्या स्वभावाची असल्याचे दिसते. लक्ष्मी व श्रीनिवासच्या कुटुंबाची ही गोष्ट सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.
या मालिकेत लक्ष्मी व श्रीनिवास यांना तीन मुली व दोन मुले असल्याचे दिसते. मंगल, भावना व जान्हवी या मुली आणि संतोष व हरीश ही मुले आहेत. भावना, जान्हवी समजूतदार आहेत, पण मंगल, संतोष व हरीश स्वत:चा विचार करणारी असल्याचे दिसतात. या मालिकेत हरीश ही भूमिका अनुज ठाकरेने साकारली आहे; तर त्याच्या पत्नीची सिंचनाची भूमिका तन्वी कोलतेने साकारली आहे.
आम्ही सतत भांडतच असतो
आता अभिनेता अनुज व अभिनेत्री तन्वीने ‘स्टार मराठी मीडिया’शी नुकताच संवाद साधला. यावेळी मालिकेत त्यांचे एकमेकांबरोबर कसे बॉण्डिंग आहे, याबद्दल त्यांनी वक्तव्य केले. तन्वी म्हणाली, “आम्ही सतत भांडतच असतो. २४ तासांमधील आम्ही २३ तास ५९ मिनिटे भांडत असतो. पण, ती भांडणे गोड असतात. मी त्याला माझी सगळी कामं सांगते.”
“त्यावर तो म्हणतो की, सिंचु तुला कळतंय का मी आता हॅरी नाहीये. मी आता अनुज आहे आणि तू तन्वी आहे. आता आपण सेटवरून बाहेर आलोय, तू मला कामं का लावतेस? तरीसुद्धा मी त्याला कामं सांगते. पण, तो भारी आहे. तो कधीच कोणत्या गोष्टीला वैतागत नाही. सुरुवातीला आमचा टॉम अँड जेरीचा बॉण्ड होता, अजूनही तसाच आहे.”
“दिवसेंदिवस त्याचं आणि माझं बॉण्डिंग खूप छान होत आहे. माझ्या डोळ्यांत बघून त्याला समजतं की मी नाराज आहे. मी कोणावर तरी चिडलेली आहे किंवा माझं काहीतरी बिनसलं आहे. मी त्याला विचारते की तू मला इतकं चांगलं कसं काय ओळखू शकतोस? त्यावर त्याचं म्हणणं असं असतं की, आता मी तुला ओळखायला शिकलो आहे.”
तन्वी पुढे म्हणाली, “हरीश-सिंचना जसे टीव्हीवर दिसतात, तसेच खऱ्या आयुष्यातदेखील आहेत. हा माझा खूप छान मित्र आहे. तो प्रत्येकवेळेस मला समजून घेतो आणि सीनच्या वेळीदेखील खूप गोष्टी सांगत असतो, कारण त्याला अनुभव आहे”, असे म्हणत तन्वीने अनुजचे कौतुक केले आहे.