Akshaya Deodhar on co actor Kunal Shukla: ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील सिद्धू व भावनाची जोडी दिवसेंदिवस लोकप्रिय ठरताना दिसत आहे. नुकतेच सिद्धूने भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र त्याने घातले होते, असा खुलासा केला आहे.
सिद्धूने गाडे पाटलांची खरी सून भावना आहे, असे भरसभेत सांगितले आणि मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या या वक्तव्याने सिद्धूच्या घरच्यांसह भावना व तिच्या घरच्यांनाही मोठा धक्का बसला होता. भावना डोळे बंद करून मंदिरात जप करत असताना सिद्धूने गुपचूप तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं.
गेल्या अनेक दिवसांपासून गळ्यात मंगळसूत्र घालून पसार होणारी व्यक्ती कोण, याचा शोध सुरू होता. आता सिद्धूने सर्वांसमोर हे मान्य केले आहे. मात्र, भावना व तिच्या घरचे त्याच्यावर नाराज असल्याचे दिसत आहेत. त्याने विश्वासघात केल्याची भावना सर्वांच्या मनात आहे.
आता भावना सिद्धूबरोबरचे नाते कधी स्वीकारणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का, खऱ्या आयुष्यातदेखील भावनाला म्हणजेच अक्षया देवधरला सिद्धूबाबत म्हणजेच अभिनेता कुणाल शुक्लाबाबत गैरसमज होता. याबद्दल या कलाकारांनी एका मुलाखतीत खुलासा केला.
अक्षया देवधरला सहअभिनेता कुणाल शुक्लाबाबत काय गैरसमज होता?
अभिनेता कुणाल शुक्ला व अक्षया देवधर यांनी काही दिवसांपूर्वीच ‘कलाकट्टा’शी संवाद साधला. यावेळी अक्षया म्हणाली, “लूक टेस्टला पहिल्यांदा भेटलो होतो. पहिली भेट आणि आताची भेट यामध्ये खूप फरक आहे, कारण आम्ही पहिल्यांदाच भेटलो होतो, त्यानंतर एकत्र कामाला सुरुवात केली. एकमेकांबरोबर काम करताना खूप मजा आली.”
कुणाल शुक्ल म्हणाला, “आम्ही एकमेकांबरोबर सीन्स करायला सुरुवात केल्यानंतर आमची चांगली मैत्री झाली.”
पुढे अक्षयाला कुणालबद्दल काय गैरसमज होता याबद्दल अभिनेत्री म्हणाली, “कुणाल जसा राहतो, त्यावरून कुणाल मराठी बोलत असेल यावरही माझा विश्वास नव्हता. हा नॉर्मल बोलत नसेल, त्याचं काहीतरी वेगळंच जग असेल, असं मला वाटत होतं. पण, तो मला आठवण करून देतो की मी पार्ल्याचा आहे, मी मराठी आहे. मला असं वाटायचं की एवढं मराठीपण त्याच्यात नसेल, पण तो मराठी असल्याची जाणीव करून देतो.”
दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत आता पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.