Anuj Thakre on Harshada Khanvilkar: ‘लक्ष्मी निवास’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत अनेक कलाकार पाहायला मिळतात. तुषार दळवी आणि हर्षदा खानविलकर प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. याबरोबरच, दिव्या पुगावकर, अक्षया देवधर, तन्वी कोलते, कुणाल शक्ला, मेघन जाधव, अनुज ठाकरे असे अनेक कलाकार दिसत आहेत.
अनुज ठाकरे या मालिकेत हरिशच्या भूमिकेत दिसत आहे. लक्ष्मी व श्रीनिवास यांचा तो मुलगा आहे. तो काहीही कमवत नाही, तसेच, पैसे कमावण्याचे सोपे उपाय तो शोधतो, म्हणून तो सतत विविध अडचणींमध्ये येतो. लक्ष्मी व श्रीनिवास त्याला वेळोवेळी समजावतात, प्रसंगी त्याचे कानही धरतात.
“तिच्यासाठी ती गोष्ट…”
लक्ष्मी ही भूमिका अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी साकारली आहे. आता अनुज ठाकरेने टेलीगप्पाला दिलेल्या मुलाखतीत हर्षदा खानविलकर यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. तो नेमकं काय म्हणाला आहे, हे जाणून घेऊ…
अनुज ठाकरे म्हणाला, “आपल्या आयुष्यात आपल्याला प्रेरणा देणार्या व्यक्ती बऱ्याच असतात. त्यात नव्याने हर्षदाताई सामील झाली आहे. हर्षदाताई खूप प्रेरणा देते. बऱ्याचदा असं होतं की मला माहित असतं की मी जे करणार आहे ती गोष्ट सगळ्यात छोटी असणार आहे. पण, तिच्यासाठी ती गोष्ट खूप मोठी असते. ती व्यक्तीच अशी आहे की तुम्ही तिच्यासाठी थोडंसं जरी केलं तरी तिच्यासाठी ती गोष्ट खूप मोठी असते. इतकी ती गोड व्यक्ती आहे.”
पुढे अनुज असेही म्हणाला, “मला तिच्याकडून एक कलाकार आणि माणूस म्हणून कसं राहायला पाहिजे हे मला शिकायचे आहे. ते शिकण्याचा मी प्रत्येक दिवशी प्रयत्न करतो. कुठलाही प्रोजेक्ट संपल्यानंतर त्या प्रोजेक्टमधील लोक तिच्याबरोबर जोडलेले असतात. ती सगळ्यांशी स्वत:हून बोलते. आपल्या आयुष्यात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या व्यक्ती येत असतात. मी म्हणतो, या सगळ्यांचा बाप म्हणजे हर्षदाताई आहेत. मला तसं व्हायचं आहे”, असे म्हणत अनुज ठाकरेने हर्षदा खानविलकर यांचे कौतुक केले.
लक्ष्मी निवास मालिकेबद्दल अभिनेता म्हणाला, “स्वामींचा साक्षात्कार असा आहे की मला असं वाटायचं की आई-बाबा रोज माझ्याबरोबर असले पाहिजेत.पण, आई-बाबा कायमच माझ्याबरोबर राहू शकत नाहीत. म्हणूनच स्वामींनी माझ्या आयुष्यात लक्ष्मी निवास ही मालिका आणली”, असे म्हणत अभिनेत्याने कृतज्ञता व्यक्त केली.
दरम्यान, लक्ष्मी निवास मालिकेत सध्या विविध वळणे येत असल्याचे दिसत आहेत. जान्हवी-जयंत, भावना-सिद्धू यांच्या आयुष्यात विविध गोष्टी घडत आहेत. त्यामुळे, आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
