Lakshmi Niwas Fame Kalyani Jadhav : ‘लक्ष्मी निवास’ या कौटुंबिक मालिकेला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. या मल्टिस्टारर मालिकेत अनेक दमदार कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हर्षदा खानविलकर, अक्षया देवधर, तुषार दळवी, दिव्या पुगावकर, मेघन जाधव, कुणाल शुक्ल या सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. नुकताच या मालिकेने ३०० भागांचा टप्पा ओलांडला यानिमित्ताने ‘झी मराठी’ने खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या सेलिब्रेशनला मालिकेतील सगळेच कलाकार उपस्थित होते.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील कलाकार या पार्टीला खास वेस्टर्न लूक करून पोहोचले होते. भावना आणि जान्हवी ब्लॅक वनपीस घालून या पार्टीला पोहोचल्या होत्या. या दोघीही खूपच सुंदर दिसत होत्या. याशिवाय मालिकेतील काही कलाकारांचे कुटुंबीय सुद्धा या पार्टीला उपस्थित होते. याचबरोबर आणखी एका अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं तिचं नाव आहे कल्याणी जाधव.
अभिनेत्री कल्याणी जाधव ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत निलांबरी अधिराज गाडेपाटील ही भूमिका साकारत आहे. निलांबरी ही सिद्धूची वहिनी असते. मालिकेत गाडेपाटील घराण्याला साजेसा असा निलांबरीचा पेहराव असतो. भरजरी साडी, सोन्याचे दागिने, केसांचा अंबाडा किंवा वेणी घातलेली असते. निलांबरी मालिकेत नेहमी सिद्धू-भावना विरोधात कटकारस्थानं करताना दिसते. मात्र, मालिकेत नेहमी साडीत अन् सोज्वळ अंदाजात दिसणारी निलांबरी प्रत्यक्षात मात्र एकदम बिनधास्त आणि बोल्ड आहे.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या पार्टीला निलांबरी लाल रंगाचा शॉर्ट बॉडीकॉन वनपीस घालून पोहोचली होती. मालिकेतील अधिराज गाडेपाटीलसह तिने रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. याशिवाय कॅमेऱ्यासमोर तिने सोलो पोझही दिल्या. तिचा हा हटके वेस्टर्न लूक सर्वत्र चर्चेत आला आहे. नेटकऱ्यांनी देखील कल्याणीच्या ग्लॅमरस लूकचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर सध्या वेंकी जेलमध्ये असून भावना त्याला सोडवण्यासाठी कोर्ट केस लढतेय हा सीक्वेन्स मालिकेत पाहायला मिळतोय. तर, दुसरीकडे जान्हवीला विश्वाचं तिच्यावर खरं प्रेम असतं याबद्दल समजलं आहे.
