Lakshmi Niwas Promo : जान्हवीने जयंतचं घर सोडल्यामुळे ‘लक्ष्मी निवास’ मालिकेला एक नवीन वळण मिळालं आहे. जयंतच्या त्रासाला कंटाळून जान्हवी पाण्यात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. मात्र, यातून ती सुखरुप वाचते. आता खरी ओळख सांगितली तर पोलीस आपल्याला पुन्हा घरी नेऊन सोडणार…परत जयंतचा त्रास हा सगळा विचार करुन जान्हवी स्वत:ची ओळख बदलते. विश्वाच्या वडिलांना ती स्वत:चं नाव तनुजा सांगते.

जान्हवीने विश्वाच्या वडिलांचा जीव वाचवल्यामुळे ते तिला स्वत:च्या घरी घेऊन येतात. पण, विश्वा त्यांचा मुलगा आहे हे सत्य जानूला माहिती नसतं. ती फक्त विश्वाचे आई-बाबा आणि सईच्या संपर्कात असते. तसंच विश्वाला सुद्धा जान्हवी घरी राहत असल्याचं सत्य अजून समजलेलं नाहीये. जानू आपल्याला कायमची सोडून गेली असाच समज त्याचाही झालेला आहे.

मात्र, आता लवकरच जान्हवीसमोर एका मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे. विश्वाचं जानूवर मनापासून प्रेम असतं. पण, जयंतने दळव्यांच्या घरी जाऊन तिला लग्नाची मागणी घातल्यामुळे विश्वा आपल्या मनातील भावना जानूला कधीच कळू देत नाही. आता जान्हवी कायमची आपल्याला सोडून गेलीये हे दु:ख पचवणं विश्वाला देखील खूप कठीण जातं. तो कपाटातून तिने गिप्ट दिलेल्या सगळ्या वस्तू बाहेर काढतो. जान्हवीचे फोटो देखील यात असतात. हे सगळं जाळून टाकायचं असा निर्णय विश्वा घेतो.

विश्वाला जान्हवीच्या आठवणी अशाप्रकारे जाळून टाकताना प्रचंड त्रास होतो. तो तिच्या फोटोकडे पाहत म्हणतो, “तू कधीच माझी का नाही झालीस जानू? माझ्या प्रत्येक श्वासात तू होतीस…या आयुष्याला काहीच अर्थ राहिलेला नाहीये… तुझ्याएवढं प्रेम कोणावर करु मी? तू माझी कधीच होऊ शकत नाहीस जान्हवी…” हे सगळं दरवाजाबाहेर उभी असलेली जान्हवी पाहते.

विश्वाला आवडत असलेली ती मुलगी म्हणजे मीच होते हे सत्य समजल्यावर तिला अश्रू अनावर होतात. आता विश्वाचं खरं प्रेम समजल्यावर जान्हवी काय निर्णय घेणार? हे दोघे एकमेकांसमोर केव्हा येणार? सर्वात महत्त्वाचं म्हणजे सई आणि विश्वाचं लग्न ठरलेलं आहे. सईने देखील जानूला खूप आधार दिलेला असतो. त्यामुळे जान्हवी आता या सगळ्यातून काय मार्ग काढणार? ती पुन्हा जयंतकडे जाणार का? हे मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना समजेल.

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा हा विशेष भाग १५ नोव्हेंबरला रात्री ८ ते ९ या वेळेत झी मराठीवर प्रसारित केला जाईल.