Zee Marathi Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे जयंतचा भूतकाळ. या मालिकेत पहिल्या दिवसापासून जयंत विकृत वागत असल्याचं पाहायला मिळत आहे. कधी तो झुरळ खातो तर, कधी बायकोला विचित्र शिक्षा देतो. इतकंच नव्हे तर जान्हवीच्या बाबतीत तो प्रचंड पझेसिव्ह आहे; अगदी बायकोने माहेरी राहिलेलं, तिच्या भावाशी संपर्क साधलेला सुद्धा जयंतला आवडत नसतं.
जयंतच्या या सगळ्या वागणुकीमुळे जान्हवी प्रचंड कंटाळते. अजून किती दिवस मी याचा त्रास सहन करू असा विचार ती मनातल्या मनात करत असते. जान्हवीने बबुच्का सशाची अतिकाळजी घेतल्यामुळे शिक्षा म्हणून जयंत तिला खोलीत बंद करून ठेवतो, असं नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात पाहायला मिळालं. यावेळी मात्र, जान्हवी एक ठाम निर्णय घेते. आता काहीही झालं तरी जयंतच्या या विकृत वागण्यामागचं खरं कारण शोधून काढायचं असं ती ठरवते.
जान्हवीला जयंतच्या कपाटात त्याच्या आश्रमाची फाइल सापडते. याचठिकाणी तो लहानाचा मोठा झालेला असतो. आता जयंतबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्याला या आश्रमात जावं लागेल असं जान्हवी ठरवते. जयंतच्या नकळत ती घरातून निघते आणि काहीही करून नवऱ्याच्या भूतकाळाबद्दलची माहिती मिळवून घरी परत जायचं असं जानू ठरवते.
जान्हवीला बरीच शोधाशोध केल्यावर जयंतच्या भूतकाळातील सर्वात मोठं सत्य समजणार आहे. जयंतला लहानपणापासून त्याच्या आजोबांनी प्रचंड टॉर्चर केलेलं असतं. मोठमोठ्या गोण्या उचलून धावणं, छोटी-मोठी चूक केल्यावर शिक्षा मिळणं हे सगळं जयंतसाठी रोजचं झालं होतं. एके दिवशी जेवण बनवताना आजोबांनी त्याच्या हातावर चटका दिल्याचंही या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
घरातील वरिष्ठांच्या अशा वागण्यामुळे जयंतच्या बालमनावर खोलवर परिणाम होऊन तो विकृती वागू लागला. त्याच्या मनात जान्हवीबद्दल प्रचंड काळजी आहे पण, तिची एकही चूक तो आजच्या घडीला सहन करू शकत नाहीये आणि यामागे त्याचा भयंकर भूतकाळ कारणीभूत आहे. जान्हवीला माहिती देणारा माणूस सांगतो, “आजही जयंतचं ते विक्राळ रुप आठवलं की माझ्या अंगावर काटा येतो.”
आता जयंतच्या भूतकाळात नेमकं काय-काय घडलंय याची सविस्तर माहिती प्रेक्षकांना ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या आगामी भागांमध्ये मिळेल. दरम्यान, जयंतचा भूतकाळ समोर येण्याचे हे विशेष भाग १५ जुलै ते २० जुलैदरम्यान रात्री ८ वाजता प्रसारित केले जातील.