Lakshmi Niwas Promo : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जान्हवी लवकरच आई होणार आहे. गरोदर असल्याची गुडन्यूज तिने नुकतीच जयंतबरोबर शेअर केली आहे. जानू आई होणार ही बातमी समजताच जयंतचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. खरंतर, प्रेग्नन्सीची बातमी समजल्यावर जयंतची प्रतिक्रिया काय असेल याचं दडपण जान्हवीला आलेलं होतं. मात्र, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ती प्रचंड खूश होते.

आता लवकरच जयंत बाबा होणार असल्याने त्याच्या वागण्या-बोलण्यात स्वभावात हळुहळू सुधारणा होईल अशी आशा जान्हवीला असते. आता खरंच जयंत बदलणार की नाही? हे मालिकेच्या येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

१५ सप्टेंबरपासून ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जान्हवी-जयंतच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. प्रत्येक लहान-लहान चुकांसाठी जान्हवीला दोषी ठरवणारा जयंत आता लाडक्या बायकोची प्रत्येक गोष्ट ऐकणार आहे. कारण, जान्हवी त्याला सोडून जायची धमकी देते.

नेहमी जयंतचा अन्याय, त्याचा राग, त्याने सुनावलेल्या शिक्षा निमुटपणे सहन करणारी साधीभोळी जान्हवी पहिल्यांदाच रौद्ररुप धारण करताना मालिकेत दिसेल. जयंतला धडा शिकवण्यासाठी जान्हवी घर सोडण्याचा निर्णय घेते. आपली बायको आणि होणारं बाळ दोघेही आपल्यापासून दूर जातील या विचाराने जयंत प्रचंड अस्वस्थ होतो. त्याला अश्रू अनावर होतात आणि ‘तू देशील ती शिक्षा मी मान्य करेन’ फक्त मला सोडून जाऊ नकोस असं तो जान्हवीला सांगतो.

“जानू तू फक्त बोल… तू मला कधीच सोडून जाणार नाहीस. तू हवं तर मला शिक्षा दे” जयंतची ही विनंती ऐकून जान्हवी रागात म्हणते, “आजवर ज्याप्रकारे तू मला छोट्या-छोट्या गोष्टींसाठी शिक्षा दिलीस तशीच शिक्षा तुलाही मिळणार आहे. आजवर तू मला या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरकैदेत ठेवलंस…तसंच एक बंधन मी तुझ्यावर घालणार आहे. मी वीक पॉइंट आहे ना तुझा? मग आपला संसार सुखाचा व्हावा असं तुला वाटत असेल, मी तुला सोडून जाऊ नये…सगळं सुरळीत व्हावं असं तुला वाटत असेल तर आता मी जे काही सांगेन ते तुला ऐकावंच लागेल.”

जान्हवीचं हे रौद्ररुप पहिल्यांदाच मालिकेत पाहायला मिळेल. याशिवाय ती जयंतला बदला म्हणून काय शिक्षा देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. नेहमी अन्याय सहन करणारी जान्हवी पहिल्यांदाच स्वत:ची ठाम बाजू नवऱ्यासमोर मांडतेय हा प्रोमो पाहून प्रेक्षकही खूश झाले आहेत. हे विशेष भाग प्रेक्षकांना १५ सप्टेंबरपासून रात्री ८ वाजता झी मराठीच्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत पाहायला मिळतील.