Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत काही दिवसांपूर्वीच जयंत-जान्हवीच्या घरी सशाचं आगमन झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या सशाला जानू प्रेमाने ‘बबुच्का’ म्हणत असते. दिवसेंदिवस जान्हवीला या सशाचा लळा लागतो. सशाबरोबर खेळणं, त्याला गाजर-कोबी भरवणं या सगळ्या गोष्टी जान्हवी मोठ्या आवडीने करत असते.
मात्र, जयंत पहिल्यापासून पझेसिव्ह असल्याने जान्हवीने सशाची काळजी घेणंही त्याला पटत नसतं. काहीही करून बबुच्काला जानूपासून लांब करायचं असं जयंत ठरवतो आणि जयंतच्या याच विकृतीमुळे त्यांच्या घरात एक मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
बबुच्का ससा घरात कुठेही दिसत नसल्याचं पाहून जान्हवी बिथरून जाते. ती खूप घाबरते आणि संपूर्ण घरात त्याला शोधू लागते. इतक्यात जयंत तिच्याकडे काय झालंय याची विचारपूस करतो पण, जान्हवी काहीच उत्तर देत नाही कारण, तिला फक्त सशाला पाहायचं असतं…इतर कोणत्याही गोष्टी ऐकून घ्यायच्या मन:स्थितीत ती नसते.
जान्हवीची शोधाशोध सुरू असताना किचनमधून तिला कूकरच्या शिट्टीचा आवाज येतो. आता कूकरची शिट्टी वाजल्यामुळे नेमकं काय घडलं असेल हा विचार करून जानू प्रचंड घाबरते. ती धावतपळत कूकर उघडायला जाते आणि सशाला जयंतने काही केलं तर नसेल ना? अशी शंका तिच्या मनात निर्माण होते.
आता जान्हवीची शंका खरी ठरणार? की जयंतने आधीच बबुच्काला दुसरीकडे लपवलं असणार याचा उलगडा लवकरच मालिकेत होणार आहे. मात्र, आता प्रत्येकाच्या मनात कूकरमध्ये नेमकं काय असेल याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या या प्रोमोमध्ये जयंतच्या विकृतीची भयंकर झलक पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी कमेंट्समध्ये नाराजी व्यक्त केली आहे. एका नेटकरी लिहितो, “मला माहितीये त्या कूकरमध्ये नक्कीच बबुच्का वगैरे नसणार, तो दुसरीकडे असेल पण असे सीन दाखवताना थोडी मर्यादा ठेवावी” दुसऱ्या एका युजरने, “लहान मुलं सुद्धा मालिका पाहतात असे सीन्स दाखवू नका” अशा प्रतिक्रिया कमेंट्समध्ये दिल्या आहेत.

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका रोज रात्री ८ ते ९ या वेळेत एक तास ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जाते.