Lakshmi Niwas Serial : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत आता जान्हवीसमोर तिच्या विकृत नवऱ्याचा खरा चेहरा उघड झालेला आहे. सुरुवातीला जानू जयंतला समजून घेऊन त्याचा सगळा त्रास सहन करायची. पण, आता जान्हवी जयंतशी फारच हुशारीने वागू लागली आहे. मात्र, लग्न झाल्यापासून जान्हवीने इतका जीव लावूनही जयंतमध्ये तिळमात्रही सुधारणा झालेली नाहीये. प्रत्येक गोष्टीवरून बायकोवर संशय घेणं, तिला वेगवेगळ्या शिक्षा देणं अशा सगळ्या गोष्टी जयंत करत असतो आणि यामुळे जानू पूर्णपणे वैतागलेली असते.
लक्ष्मी आणि श्रीनिवास आधीच मोठ्या संकटात असतात. त्यांना संतोषचा त्रास सहन करावा लागत असतो, त्यात सिंचनाचे नखरे, भावनाचं टेन्शन यामुळे जान्हवी या सगळ्या गोष्टी माहेरच्या लोकांपासून लपवून ठेवते. आता आपलं मन कोणासमोर मोकळं करायचं या विचारात ती असते. अशातच तिच्या मदतीला एक खास व्यक्ती देवासारखी धावून येणार आहे. अर्थात, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. हा अभिनेता नेमका कोण आहे जाणून घेऊयात…
जयंत कन्स्ट्रक्शन साइटवर गेलेला असतो, यावेळी त्याचा अपघात होतो. जयंत घरी आल्यावर जान्हवी फोनवर एका व्यक्तीला सांगते, जयंतची दृष्टी गेल्याने आमच्या घरी एका शेफची गरज आहे आणि नेहमीप्रमाणे जयंत या शेफचा इंटरव्ह्यू घेऊन त्याला नोकरीवर ठेवणार असतो. यामागे जान्हवीची खास योजना असते, डॉक्टरची ट्रिटमेंट देऊन ती नवऱ्याला सुधारण्याचा प्रयत्न करत असते.
जान्हवी-जयंतच्या घरी येणारा हा नवीन शेफ खरंतर डॉक्टर असतो. त्याचं नाव आहे डॉ. माधव…त्यांना पाहताच जान्हवी म्हणते, “डॉक्टर तुम्ही श्रीकृष्णाच्या रुपात आमच्या घरी आला आहात. देवा प्लीज तेच या इंटरव्ह्यूमध्ये पास होऊदेत.” ‘लक्ष्मी निवास’मध्ये डॉ. माधवच्या भूमिकेत एन्ट्री घेणार आहे लोकप्रिय अभिनेता अमेय बर्वे.
अमेयने यापूर्वी ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘सावली होईन सुखाची’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. काही सिनेमांमध्येही अमेय झळकला आहे. आता तो ‘लक्ष्मी निवास’ मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी अमेय सज्ज होत आहे.
दरम्यान, मालिकेत १६ ऑगस्टच्या भागात अमेय बर्वेची एन्ट्री होणार आहे. लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सोनारने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत अमेयला या नव्या मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.