Lakshmi Niwas Promo : ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत दळवी कुटुंबात सध्या संतोषमुळे वाद सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे भावना गाडेपाटलांच्या घरात सगळ्यांची बोलणी ऐकून आयुष्य जगतेय पण, तिला या सगळ्यात सिद्धूची खंबीर साथ मिळताना दिसतेय. मात्र, जान्हवीच्या आयुष्यात जयंतमुळे मोठी उलाढाल होणार आहे. या मालिकेच्या आगामी भागात तीन मोठे ट्विस्ट येणार आहेत. ते नेमके काय आहेत? पाहुयात….

‘लक्ष्मी निवास’मधील पहिला ट्विस्ट

लक्ष्मीने मुलांना वठणीवर आणण्यासाठी मध्यंतरीच्या काही भागांमध्ये कडकलक्ष्मीचं रूप धारण केलं होतं. यावेळी तिने संतोषची चांगलीच कानउघडणी केल्याचं पाहायला मिळालं. मात्र, त्यानंतर लक्ष्मी आणि श्रीनिवास या दोघांनी हे सगळं नाटक मुद्दाम केल्याची कबुली दिली. भावना आणि जान्हवीचं लग्न झाल्यामुळे आता संतोष-हरीश या पोटच्या मुलांपेक्षा लक्ष्मीला वेंकीचा सर्वात मोठा आधार असतो.

वेंकी नेहमी लक्ष्मीच्या मनासारखा वागत असतो. आनंदीला शाळेतून वेळेत घरी आणतो. लक्ष्मी आणि श्रीनिवासचा मनापासून आदर करतो. अर्थात हे सगळं संतोष आणि हरीशला बघवत नाही. त्यामुळे हे दोघं प्लॅन करून वेंकी आणि लक्ष्मीच्या नात्यात दुरावा निर्माण करणार आहेत.

‘लक्ष्मी निवास’मधील दुसरा ट्विस्ट – भावना व सिद्धूचं नातं

भावना लग्नाआधीपासून तिच्या सगळ्या वैयक्तिक समस्या गाडेपाटलांबरोबर शेअर करत असते. पण, आपण ज्या गाडेपाटलांशी बोलतो तो सिद्धू आहे हे सत्य भावनाला माहिती नसतं. हे सत्य फक्त जान्हवीला भावना-सिद्धूच्या लग्नादरम्यान माहीत झालेलं असतं.

आता सिद्धू हाच गाडेपाटील आहे आपण, एवढे दिवस ज्या माणसाशी फोनवर बोलतोय, जो माणूस आपल्याला दिवसरात्र मदत करतोय तो आपलाच नवरा आहे हे सत्य भावनासमोर येणार आहे.

सिद्धू रूममध्ये आल्यावर भावना त्याला एकाजागी उभा राहा असा इशारा करते आणि गाडेपाटलांना फोन करते. इतक्यात सिद्धूचा फोन वाजतो आणि भावनाच्या चेहऱ्यावरचा रंग बदलतो. आता हे सत्य भावनासमोर उघड झाल्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल? ती सिद्धूच्या प्रेमाचा स्वीकार करणार की नाही हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.

‘लक्ष्मी निवास’मधील तिसरा ट्विस्ट – जयंत व जान्हवी यांचं नातं

जयंतमुळे जान्हवीला अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतोय. बायकोकडून जरा काही चूक झाली की, तो तिला लगेच मोठी शिक्षा देऊन मोकळा होतो. या सगळ्यामुळे जान्हवीला भयंकर मनस्ताप सहन करावा लागत आहे. आताही बायको मंगळागौरीत सगळ्यांसमोर नाचू नये यासाठी जयंतने तिला खोलीत बंद करून ठेवल्याचं पाहायला मिळालं होतं.

याशिवाय जान्हवीसमोर जयंतचा वाईट भूतकाळ सुद्धा उघड झाला आहे. यामुळेच या दोघांच्या आयुष्याचा एक नवीन प्रवास मालिकेत सुरू होईल. पण तो भयानक असेल की चांगला? समोर आलेल्या प्रोमोत हा प्रवास जान्हवीसाठी भयंकर असल्याची जाणीव होते. पण, आता जानू यातून कसा मार्ग काढणार…तिला जयंतला वठणीवर आणण्यासाठी कोणाची साथ मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत हे ट्विस्ट प्रेक्षकांना ४ ऑगस्टला पाहायला मिळतील. ही मालिका रोज रात्री ८ ते ९ या वेळेत ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जाते.