Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिका सर्वात जास्त जयंतमुळे चर्चेत असते. जयंतचा विकृत स्वभाव, त्याची क्रूरता, त्याचं बायकोशी विक्षिप्तपणे वागणं याचे प्रोमो सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत येतात. याशिवाय जान्हवीने जरा काही चूक केली की, मालिकेत जयंत तिला नवनवीन विचित्र शिक्षा देत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, आता जयंतच्या या विक्षिप्त स्वभावाला नेटकरी वैतागले आहेत.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जान्हवी कॉलेजमध्ये पहिली येते. तिचा सत्कार करण्यासाठी जयंत स्वत: उपस्थित असतो. पण, त्याच्या आदल्या दिवशीच जयंतने तिला कपाटात डांबून ठेवून शिक्षा दिलेली असते. जान्हवी जयंतवर कितीही चिडली तरी, ती कधीच सर्वांसमोर जयंतचा अपमान करत नाही. एवढंच काय तर, स्वत:च्या आई-बाबांना सुद्धा तिने जयंतचं सत्य सांगितलेलं नसतं.
जयंत काहीही झालं तरी आपल्यावर प्रेम करतो आणि तो आपला नवरा आहे असा विचार करून जान्हवी त्याच्या सगळ्या चुका पोटात घालत असते. दुसरीकडे जयंत बायकोच्या बाबतीत प्रचंड पझेसिव्ह असतो. कॉलेजमध्ये जानू ज्या बेंचवर बसायची. तो बेंच उचलून जयंत घरी आणतो.
कॉलेजमधला बेंच जयंतने आठवण म्हणून घरी आणल्यामुळे जान्हवी प्रचंड आनंदी होते. पण, तिला पुढे काय घडणार याची जराही कल्पना नसते. जयंत संपूर्ण बेंचची निरखून तपासणी करतो. यावेळी त्याला बेंचवर एका ठिकाणी ‘आय लव्ह यू जानू’ असं लिहिलं असल्याचं पाहायला मिळतं. ती गोष्ट पाहून जयंत प्रचंड संतापतो आणि या सगळ्याची शिक्षा तो पुन्हा एकदा जानूला देणार आहे.
प्रेक्षक मालिकेचा हा प्रोमो पाहून भयंकर वैतागले आहेत. “जयंतचा खरा चेहरा लवकरच जगासमोर यावा नाहीतर जान्हवीचं काही खरं नाही”, “बंद करा हा वेडेपणा..फालतू मालिका झालीये जयंतमुळे”, “या जयंतचा असा वेडेपणा दाखवून चांगल्या आणि सुंदर मालिकेची वाट लावली तुम्ही” अशा असंख्य कमेंट्स या प्रोमोवर आल्या आहेत.

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर रोज रात्री ८ ते ९ या एक तासांच्या वेळेत प्रसारित केली जाते.