Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सिद्धूने भर सभेत भावनाच त्याची पत्नी असल्याचं मान्य केलं आहे. देवीच्या उत्सवात सिद्धू गुपचूप भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिच्याशी लग्न करतो. हे सत्य त्याने एवढे दिवस लपवून ठेवलेलं असतं. पण, आता पूर्वीशी लग्न ठरल्यामुळे सिद्धूला सर्वांसमोर भावनाच त्याची पत्नी असल्याचं सत्य सांगण्याशिवाय पर्याय नसतो.
सिद्धू भर सभेत भावनाच त्याची पत्नी असल्याची कबुली देतो. यानंतर उपस्थित सर्वांनाच धक्का बसतो. गाडेपाटील कुटुंबीयांना यानंतर संताप अनावर होतो. कारण, काही करून त्यांना भावना त्यांची सून म्हणून मान्य नसते. सिद्धूच्या आईला सुद्धा आपल्या लेकाचं पूर्वीशी लग्न व्हावं असं वाटत असतं. पण, सिद्धू पत्नी म्हणून भावना सोडून इतर कोणाचाही स्वीकार करणार नाही असं जाहीर सभेत सांगतो.
आता भावना सिद्धूला माफ करणार की नाही हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागांमध्ये पाहायला मिळेल. मात्र, या सगळ्यानंतर गाडेपाटलांच्या घरात मोठा तमाशा होतो. सगळेजण सिद्धूवर चिडतात. याचा परिणाम संपतरावांच्या राजकारणावर सुद्धा होणार असतो. कुटुंबीयांनी समजूत काढूनही सिद्धू त्याच्या मतावर ठाम असतो. काहीही झालं तरी या घरात पत्नी म्हणून भावनाच येईल असं तो सगळ्या गाडेपाटलांना स्पष्ट सांगतो.
सिद्धू म्हणतो, “भावना मॅडमना या घरात मी माझी पत्नी म्हणून आणणार आणि त्यांना या घरच्या सुनेचा मान मिळवून देणार…हा सिद्धीराज गाडेपाटील याने दिलेला शब्द आहे.”
यावर सिद्धूची आई त्याला घराबाहेर जाण्यापासून अडवते आणि म्हणते, “थांब सिद्धीराज तू भावनासाठी या घरातून पाऊल बाहेर टाकलंस ना…तर, तुला माझं प्रेत ओलांडून जावं लागेल.” पुढे सिद्धू सांगतो, “नाही आई… या घरात आता मी पुन्हा पाऊल टाकेन तर, ते फक्त आता भावना मॅडमबरोबरच!”
सिद्धूचा निर्णय ऐकताच त्याच्या आईला अश्रू अनावर होतात. तर, त्याचे वडील राग, द्वेषाने त्याच्याकडे बघत असतात. मालिकेचा हा विशेष भाग १२ जूनला प्रसारित करण्यात येणार आहे. आता सिद्धू पुढे काय करणार? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. गाडेपाटलांचं घर सोडून भावनाबरोबर संसार थाटणार, भावना सिद्धूला कशी माफ करणार? या सगळ्यावर लक्ष्मीचं म्हणणं काय असेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.
दरम्यान, प्रोमोमध्ये दिसणारा सिद्धूचा दबंग अंदाज आणि त्याने सगळ्या कुटुंबीयांसमोर बायकोची घेतलेली बाजू या गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. “कडक सिद्धू”, “वॉव सिद्धू रॉक्स”, “शाब्बास सिद्धू”, “बस सिद्धू सारखा नवरा असावा”, “नवरा हाच हवा” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत. ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर ८ ते ९ या वेळेत प्रसारित केली जाते.