Lakshmi Niwas : सिद्धूने देवीच्या उत्सवादरम्यान गुपचूप भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं. मात्र, अजूनही त्याने भावनासमोर आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाहीये. त्याला लवकरात लवकर मंगळसूत्राचं सत्य भावनाला सांगायचं असतं. त्याचं प्रेम देखील भावनासमोर व्यक्त करायचं असतं पण, यामध्ये नेहमीच काही ना काही अडथळे येत असतात. अशातच आता सिद्धूसमोर नवीन संकट उभं राहणार आहे.
सुरुवातीला लग्नासाठी नाही म्हणणाऱ्या पूर्वीला अचानक सिद्धू आवडू लागतो. ती तिच्या प्रेमाची कबुली सिद्धूसमोर देते पण, त्याच्या मनात फक्त भावना असते. सिद्धू आणि पूर्वी बाहेर गेलेले असताना, तिच्या डोळ्यात कचरा उडतो. पूर्वीला त्रास होऊ नये म्हणून सिद्धू तिच्या डोळ्यात फुंकर मारतो आणि नेमका हाच क्षण पाठमोऱ्या बाजूने एकजण कॅमेऱ्यात कैद करतो.
आता सिद्धू-पूर्वीचा हा फोटो थेट वर्तमानपत्रात छापून येणार आहे. खरंतर या सगळ्यात सिद्धूचा काहीच दोष नसतो. पण, या फोटोमुळे त्याच्या वडिलांची प्रचंड बदनामी होण्याची शक्यता असते. यासाठी गाडेपाटील व पूर्वीच्या बाबांना सिद्धू एक प्लॅन सांगतो पण, आता या प्लॅनमध्ये तो स्वत:च अडकणार आहे….कसा ते पाहुयात…
“आपण एक जाहीर सभा घेऊन तुम्हा दोघांच्या युतीची माहिती सर्वांना देऊया” असा सल्ला सिद्धू वडिलांना देतो. त्याचा सल्ला ऐकताच सगळेजण सुटकेचा निश्वास सोडतात.
पण, पूर्वीचे बाबा यानंतर एक मोठा निर्णय घेतात ते म्हणतात, “आपण सभा आयोजित करूच पण, त्याचबरोबर पूर्वी आणि सिद्धूच्या लग्नाची घोषणा देखील जाहीरपणे करूयात.”
आता सिद्धूने दिलेला सल्ला त्याच्यावरच भारी पडणार आहे. भर सभेत जर पूर्वी आणि सिद्धूच्या लग्नाची घोषणा केली तर, पुढे जाऊन भावनाचं काय होणार? तिची जबाबदारी सिद्धू कसा स्वीकारणार? त्याचं लग्न नेमकं कोणाशी होणार? हे सगळे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात मालिकेचा हा प्रोमो पाहून निर्माण झाले आहेत.
आता येत्या काळात सिद्धू या मोठ्या संकटातून कसा बाहेर पडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर रोज रात्री ८ ते ९ या वेळेत प्रसारित केली जाते.