Lakshmi Niwas Serial Bhavana Siddhu : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत अलीकडेच लक्ष्मी आणि श्रीनिवास हे दोघंही त्यांच्या धाकट्या सुनेला म्हणजेच सिंचनाला घरी परत आणण्यासाठी गाडेपाटलांच्या घरी गेल्याचं पाहायला मिळालं. सिंचना सुरुवातीला घरी परतण्यासाठी नकार देते पण, त्यानंतर ती पुन्हा सासरी जाण्यासाठी तयार होते.
मात्र, पुन्हा सासरी आल्यावर सिंचना सर्वांसमोर एक मोठी अट ठेवणार आहे. ती तिचा संसार नव्याने वेगळा थाटणार आहे. अर्थात, सिंचना स्वत:साठी आणि पती हरीशसाठी जेवणही वेगळं बनवणार आहे. धाकट्या सुनेचा निर्णय ऐकून लक्ष्मी-श्रीनिवासचे डोळे पाणावतात. पण, सिंचना घरी राहावी याकरता त्यांना मनात नसूनही ही अट मान्य करावी लागणार आहे.
दुसरीकडे जयंतला कंटाळलेली जान्हवी एक मोठं पाऊल उचलणार आहे. बायकोला छळण्यासाठी जयंतने घरात ‘जयंतवाणी’ हा नवीन खेळ सुरू केला आहे. याशिवाय जानूला भीती दाखवण्यासाठी त्याने उंदीर सुद्धा आणलेला असतो. आता येत्या भागात जयंत जानूला एका पिंजऱ्यात बंद करून ठेवणार असल्याचं पाहायला मिळेल. जयंतच्या या विक्षिप्त स्वभावाला जान्हवी प्रचंड कंटाळते आणि आता ती एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. गोळ्यांची पावडर करून ती दुधात मिक्स करते… आता या गोळ्या नेमक्या कसल्या आहेत? आणि हे दूध जयंतने प्यायल्यावर नेमकं काय होणार, पतीला सुधारण्यासाठी जान्हवीने केलेला हा उपाय कामी येईल का हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.
सिद्धूला झाला स्मृतिभ्रंश
भावनावर जीवापाड प्रेम करणाऱ्या सिद्धूला आता भावनाच आठवत नाहीये. प्रोमोमध्ये सिद्धूच्या डोक्याला पट्टी बांधली असून त्याला काहीच आठवत नाहीये असं पाहायला मिळतंय. आता सिद्धूला मेमरी लॉस झालाय, त्याला भावना कोण माहिती नाही…या संधीचा फायदा त्याची आजी घेते आणि सुनेला घराबाहेरचा रस्ता दाखवते. नेहमी आजीचा छळ सहन करणारी भावना आता मात्र गप्प बसत नाही. तुम्ही काहीही बोला पण, यांना बरं वाटल्याशिवाय मी हे घर सोडून जाणार नाही असा ठाम निर्णय भावनाने घेतलेला आहे. आता सिद्धूची स्मृती पुन्हा येईपर्यंत भावनाला त्याच्यासाठी सत्त्वपरीक्षा द्यावी लागणार आहे.
दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा हा विशेष भाग १० ऑगस्ट दुपारी २ आणि रात्री ८ वाजता प्रसारित केला जाणार आहे.