Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जान्हवी आणि जयंत यांचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. पण, या सगळ्यात जान्हवीसमोर जयंतचं खरं रुप बाहेर येणार आहे. जयंतची मानसिक विकृती पाहून जान्हवी प्रचंड घाबरणार आहे. एकीकडे लग्नानंतर जान्हवीच्या आयुष्यात वेगळं वळण आलेलं असताना दुसरीकडे, दळवींच्या मोठ्या लेकीच्या म्हणजेच भावनाच्या आयुष्यात एक गोड सुरुवात होणार आहे.

सिद्धीराज गाडेपाटील म्हणजेच सिंचनाच्या भावाला भावना पाहताक्षणी आवडलेली असते. भावना आणि सिंचना या एकमेकींच्या नणंद-भावजय असल्याचं सत्य नुकतंच सिद्धू समोर आलेलं आहे. पण, जान्हवीच्या लग्नात त्याच्या मनात एक वेगळा गैरसमज निर्माण होतो. यामागची सविस्तर पार्श्वभूमी जाणून घेऊयात…

सिद्धूचा गैरसमज कोण दूर करणार?

भावनाचं तिच्या कंपनीचे मालक श्रीकांत इनामदार यांच्याशी लग्न ठरतं. पण, घरगुती वादांमुळे श्रीकांतचा अपघात घडवण्यात येतो. परिणामी, लग्नाच्याच दिवशी श्रीकांतचा मृत्यू होतो. यामुळे शेवटच्या क्षणाला श्रीकांतची आई वनजा भावनाकडून आनंदीचा आयुष्यभर सांभाळ कर असं वचन घेते. यानुसार आता आनंदी कायमस्वरुपी दळवी कुटुंबीयांकडे राहणार आहे. लग्नात सिद्धू… भावना आणि आनंदी या दोघींना एकत्र पाहतो. यामुळे भावनाला एक मुलगी असल्याचा गैरसमज सिद्धूच्या मनात निर्माण होतो. पण, आता लवकरच त्याचा हा गैरसमज दूर होणार आहे.

सिद्धूची मोठी वहिनी निलांबरी गाडेपाटील दिराच्या मनात नेमकं काय सुरूये हे अचूक ओळखते. ती अस्वस्थ झालेल्या सिद्धूशी बोलायला जाते. निलांबरी सिद्धूला म्हणते, “मला माहितीये तुझं काहीतरी झालंय, सिंचनाच्या नणंदेच्या बाबतीत काही आहे का?” यावर सिद्धू म्हणतो, “तिचं लग्न झालंय आणि तिला एक मुलगी सुद्धा आहे.” यावर निलांबरी म्हणते, “भावनाचं लग्न झालेलं नाहीये. ती केवळ आई म्हणून आनंदीचा सांभाळ करते.” हे ऐकताच सिद्धूचा आनंद गगनात मावेनासा होतो. आता तो वारंवार भावनाला पाहण्याच्या उद्देशाने तिच्या घरी येत-जात राहणार असं या नव्या प्रोमोवरून स्पष्ट होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘झी मराठी’ने, “सुरु होणार भावना आणि सिद्धूच्या प्रेमाची लव्हस्टोरी” असं कॅप्शन देत हा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ४ आणि ५ फेब्रुवारीला हा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.