झी मराठी वाहिनीवर नुकत्याच ‘वीण दोघांतली ही तुटेना’ व ‘तारिणी’ या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. काही दिवसांपासून या मालिकांची मोठी चर्चा सुरू होती. आवडते कलाकार पुन्हा एकदा भेटीला येणार असल्याने प्रेक्षकांच्या मनातही उत्सुकता होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून, ११ ऑगस्टपासून या मालिका प्रदर्शित झाल्या आहेत.
झी मराठी वाहिनीवर ‘लाखात एक आमचा दादा’, ‘सावळ्याची जणू सावली‘, ‘लक्ष्मी निवास’, ‘कमळी’, ‘तुला जपणार आहे’, ‘देवमाणूस’, ‘वीण दोघांतली ही तुटेना’, ‘तारिणी’, ‘चला हवा येऊ द्या’, अशा एकापेक्षा एक मालिका आणि कार्यक्रम प्रदर्शित होतात.
दहीहंडीच्या निमित्ताने ‘झी मराठी’चे कलाकार एकत्र येणार
आता सगळे कलाकार दहीहंडीच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सर्व मालिकांतील कलाकार एका वेगळ्या अंदाजात दिसत आहेत. हे कलाकार नेहमीपेक्षा वेगळ्या वेशभूषांमध्ये दिसत आहेत. तसेच नृत्यदेखील सादर करताना दिसत आहेत.
गोविंदा आला रे आला ,असे स्टेजवर लिहिल्याचे दिसत आहे. संकर्षण कऱ्हाडे सूत्रसंचालन करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, काही खेळही या मंचावर रंगणार असल्याची झलक या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहेत. मालिकेतील नायक-नायिकांमध्ये ही स्पर्धा होणार असल्याचे दिसत आहे. इतर कलाकार त्यांना प्रोत्साहन देत आहेत. तसेच, दहीहंडीदेखील फोडली जाणार आहे, असे या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. मालिकांमध्ये दिसणारे नायक-नायिका खलनायक एकत्र येऊन, मजा करताना दिसत आहेत.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “झी मराठीच्या मंचावर गोपाळकाला रंगणार, मनोरंजनाची हंडी कोणती टीम फोडणार?”, अशी कॅप्शन दिली आहे. हा एपिसोड रविवारी १७ ऑगस्टला रविवारी दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता प्रदर्शित होणार आहे.
आता या कार्यक्रमात नेमकं काय होणार, स्पर्धा कोण जिंकणार, कोणत्या गाण्यावर हे कलाकार थिरकणार आणि दहीहंडी फोडताना काय घडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, झी मराठीवरील सर्वच मालिकांमध्ये काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. ‘लक्ष्मी निवास’पासून ते ‘देवमाणूस’पर्यंत सर्व मालिकांमध्ये पुढे काय घडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.