Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत वेंकी आणि आरतीचा लग्नसोहळा नुकताच पार पडला. आरतीला गावचे गुंड उचलून नेतात आणि रात्रभर तिला कोंडून ठेवण्यात येतं. गुंडांच्या तावडीतून सुटका झाल्यावर आरती खूप रडत असते. आता तिच्याशी लग्न कोण करणार याचा विचार करत असते. इतक्यात वेंकी तिच्याजवळ जातो आणि आरतीला आधार देतो. तुझ्याशी मी लग्न करेन असं तो हातवारे करून आरतीला सांगतो. कोणालाही न सांगता दोघेही लग्नाचा निर्णय घेतात.
वेंकी दादाने लग्न केल्याची बातमी जान्हवीपर्यंत पोहोचते. आपल्या दादाचं लग्न झालंय ही बातमी ऐकून जान्हवीला प्रचंड आनंद होतो. ती वेंकीला व्हिडीओ कॉल करून वहिनीशी प्रेमाने वाग असा सल्ला देत असते. हे सगळं जयंत दारामागे लपून ऐकत असतो. जान्हवी तिच्या माहेरच्या लोकांशी एवढं प्रेमाने बोलतेय हे पाहून जयंतचा राग अनावर होतो. तो जान्हवीवर प्रचंड संतापतो पण, या सगळ्याचा काहीच उपयोग होत नाही.
दुसऱ्या दिवशी वेंकी दादा आणि वहिनीला आपण घरी जेवायला बोलवूया असा हट्ट जान्हवी जयंतजवळ धरते. अर्थात ही कल्पना सुद्धा जयंतला अजिबात पटत नाही. पण, जान्हवीच्या सतत विरोधात गेलो तर ती आपल्याला सोडून जाईल अशी भीतीही जयंतच्या मनात असते. त्यामुळे तो वेंकीला घरी जेवायला आमंत्रित करण्यासाठी जानूला परवानगी देतो.
वेंकी आणि आरती जान्हवीच्या घरी येतात. जानूचं घर पाहून आरती प्रचंड खूश होते. ते तिघंही गप्पा मारत हॉलमध्ये बसतात. इतक्यात वेंकी जयंतबद्दल चौकशी करतो. यावर जान्हवी जयंतला बरं नाहीये असं सांगते. यानंतर आरती जयंतला लवकर बरं वाटावं यासाठी काढा बनवते. हा काढा घेऊन वेंकी जयंतच्या रुममध्ये जातो. कडू काढा पिताना जयंतला ठसका बसतो कारण, खरंतर तो आजारपणाचं नाटक करत असतो.
जयंतला ठसका लागल्याने वेंकी त्याच्यासाठी रुमाल शोधत असतो. जयंत रुमाल कपाटात मिळेल असं वेंकीला सांगतो. वेंकी जेव्हा जयंतचं कपाट उघडतो तेव्हा त्याला जयंतच्या काळ्या रंगाच्या सूटवर तशीच बटणं दिसतात जी त्याला विहिरीत ढकलणाऱ्या माणसाच्या कोटवर देखील होती. त्यामुळे विहिरीत ढकलणारा माणूस दुसरा-तिसरा कोणी नसून तो जयंतच आहे हे सत्य वेंकीला समजणार की नाही… हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा हा विशेष भाग २४ आणि २५ मे रोजी रात्री ८ वाजता प्रसारित केला जाणार आहे.