Lakshmi Niwas Promo : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मी आणि श्रीनिवास यांनी रूप बदलून डॅशिंग अंदाजात दळवी निवासमध्ये एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळत आहे. साधीभोळी लक्ष्मी मुलांना धडा शिकवण्यासाठी कडकलक्ष्मीचा अवतार घेऊन घरात प्रवेश करते. मंगल, हरीश आणि संतोष यांना धडा शिकवण्यासाठी लक्ष्मी-श्रीनिवासने आखलेला हा प्लॅन असतो.
श्रीनिवासची नोकरी गेल्यापासून संतोष आपल्या आई-वडिलांशी एकदम तुच्छपणे वागत असतो. प्रत्येक गोष्टीचा हिशोब त्यांच्याकडे मागत असतो. याशिवाय छोट्या आनंदीला घरात ठेवायचं नाही, तिच्यामुळे खर्च अधिक होतो असं त्याचं म्हणणं असतं. संतोषच्या याच सगळ्या त्रासाला कंटाळून लक्ष्मी त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेते.
आता हरीश, मंगल आणि संतोष या तिघांनी मिळून लक्ष्मी-श्रीनिवासकडून पैसे उकळण्याचा प्लॅन बनवला आहे. पण, हे तिघंही स्वत:चा वैयक्तिक फायदा बघत असतात. त्यामुळे संतोष भावंडांविरोधात आईचे कान भरायला जातो. तो लक्ष्मीला म्हणतो, “हरीश आणि मंगल पैशांसाठी या थराला जातील असं वाटलं नव्हतं.”
यानंतर लक्ष्मी चांगलीच भडकते आणि संतोषला सुनावते. ती आधीच त्याच्या वागणुकीमुळे वैतागलेली असते…त्यामुळे आता ती संतोषच्या सगळ्या चुकांचा पाढा घरात सर्वांसमोर वाचून दाखवणार आहे.
लक्ष्मी संतोषला म्हणते, “तू मंगल आणि हरीशबद्दल माझ्याकडे तक्रार करतोस. त्या हरीशला चुकीचं वागायला तू शिकवलंस, वरदला लाच देऊन आमच्यासमोर नाटक करायला लावलंस, तू एक नंबरचा स्वार्थी आणि आपलपोटी मुलगा आहेस. तू मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाऊ शकतोस. बघ माझ्या डोळ्यात आणि म्हण… आई तू जे बोलतेस ते खरं नाहीये. इथे केलेली पापं इथेच फेडावी लागतात संतोष!”
संतोषच्या चुका ऐकून त्याची पत्नी वीणाला अश्रू अनावर होतात. तर, बाहेरून मंगल आणि हरीश सगळं काही पाहत असतात. आईचं रौद्ररुप पाहून ते दोघंही घाबरतात आणि घरात पाऊल टाकण्याची हिंमतही करत नाहीत.
दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा हा विशेष भाग २५ जुलैला रात्री ८ वाजता प्रसारित केला जाणार आहे. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “हाच कडकलक्ष्मीचा अवतार कायम असावा”, “नादखुळा कडकलक्ष्मी” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.