Chetan Vadnere Talks About Daily Soabs : चेतन वडनेरे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या तो ‘लपंडाव’ या नवीन मालिकेमुळे चर्चेत आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’नंतर अभिनेता दीड वर्षानंतर नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच त्याने मालिकांमधील भूमिकांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
चेतनने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मालिकांमधील भूमिका निवडण्याबद्दल, तसेच बऱ्याच मालिकांना नकार देण्यामागचं कारण सांगितलं आहे. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्याला ” ‘ठिपक्यांची रांगोळी’नंतर मध्ये बराच वेळ गेला आणि त्यानंतर आता तू ‘लपंडाव’मधून दिसत आहेस, तर हा सयंम तुझ्याकडे आहे भूमिका निवडण्याबाबत?” असं विचारण्यात आलेलं.
चेतन विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाला, “माझ्यामध्ये सयंम आहे. मला काम मिळवण्याची किंवा दिसण्याची घाई नाहीये. मला असं वाटत नाही की, दोन-तीन वर्षं नाही दिसलो, तर मी संपेन.तर मला वाटतं की, मी दोन-तीन वर्षांनंतर काय करतोय त्यावर ते ठरतं की, मी संपेन की टिकणार आहे. त्यामुळे मला त्याची काही भीती वाटत नाही. चांगलं काम येण्यासाठी जो सयंम लागतो, तो माझ्यामध्ये आहे.”
चेतन पुढे म्हणाला, ” ‘ठिपक्यांची रांगोळी’नंतर मी जवळपास १० मालिका नाकारल्या. कारण- त्यातल्या सहा मालिकांमध्ये ‘ठिपक्यांची रांगोळी’मधील शशांकसारखेच रोल होते. फक्त त्यामध्ये चष्मा नाहीये किंवा एखादी लहान मुलगी आहे वगैरे आणि त्या चांगल्या वाहिनीवरच्या मालिका होत्या; पण म्हटलं हेच जर मी आता केलं, तर लोकांना वाटेल हा तेच तेच करतो. मग ते वाटू नये म्हणून मी वेगळ्या कामासाठी थांबलो होतो आणि आता मला वेगळं काम मिळालंही आहे.”
लपंडावमधील भूमिकेबद्दल चेतन वडनेरेची प्रतिक्रिया
चेतन ‘लपंडाव’मधील त्याच्या भूमिकेविषयी म्हणाला, “प्रोमोमध्ये जे पात्र आहे आणि मालिकेत जे आहे, त्यात फरक आहे. मला ते आवडलं.” चेतनला पुढे नाही म्हणनं कठीण असतं का असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर तो म्हणाला, “नाही म्हणणं कठीण असतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा आहे. मला दिसण्याबद्दल काही वाटत नाही; पण पैसा महत्त्वाचा आहे. माझा खर्च तसा कमी होता. मी काटकस करतो. उधळपट्टी करीत नाही. नुकतंच मी घर घेतलं. त्यामुळे मला जरा आर्थिक गोष्टी जाणवल्या. आयुष्यात पैसा फार महत्त्वाचा आहे; पण मी इतकी बचत नक्कीच करतो की, इतके इतके महिने काम नाही केलं तरी माझे सगळे व्यवहार होऊ शकतील.”
दरम्यान, अभिनेता चेतन वडनेरेची ‘लपंडाव’ ही नवीन मालिका आजपासून ‘स्टार प्रवाह’वर सोमवार ते शनिवार दुपारी २ वाजता पाहता येणार आहे. यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री कृतिका देव व रूपाली भोसले महत्त्वाच्या भूमिकेतून झळकणार आहेत.