Marathi Actor On Groupism In Industry : इंडस्ट्रीतील झगमगत्या दुनियेत कित्येक कलाकार नवी स्वप्न घेऊन येतात. काही यशस्वी होतात; तर काहींच्या पदरी अपयश येतं. अपयशामुळे अनेक कलाकार टोकाचं पाऊल उचलतात. बऱ्याचदा याला इंडस्ट्रीतील ग्रुपिझम, नेपोटीझमही जबाबदार असतं. यामधूनच बहुतांश वेळा काम न मिळाल्याची खंत कलाकार व्यक्त करतात. हिंदी सिनेसृष्टीतील या ग्रुपिझमबद्दलच्या चर्चा सर्वांनाच माहीत आहे.

गेल्या काही वर्षात मराठी सिनेइंडस्ट्रीतही या गटबाजीचं प्रमाण वाढताना दिसत आहे. मराठी सिनेसृष्टीत होत असलेल्या गटबाजीवर कलाकार नेहमीच व्यक्त होत असतात. या गटबाजीचा परिणाम कलाकारांवर आणि पर्यायाने त्यांच्या कामावर होत असल्याचा आरोप अनेक कलाकार करतात.

अशातच टिव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्याने या ग्रुपिझमबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे, हा अभिनेता म्हणजे चेतन वडनेरे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत चेतनने गटबाजीबद्दल त्याची प्रतिक्रिया दिली असून मराठी इंडस्ट्रीमधील कास्टिंग पद्धतीवरदेखील त्यानं आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं.

मराठीतील ग्रुपिझमबद्दल चेतन म्हणाला, “हो… हो… इथे गुपिझम आहे. पण आता मी त्यांच्या ग्रुपमध्ये गेलो: तर ते काय मला चल… चल… हट… हट… असं म्हणणार नाहीत. मला स्वतःहून त्या ग्रुपमध्ये जावं लागेल. आपल्याकडे एकतर निर्मिती संस्थाच कास्टिंग करतात किंवा दिग्दर्शकच कास्टिंग करतो. अर्थात त्यानेच करावं; पण कास्टिंग दिग्दर्शक किंवा कास्टिंग हब असं काही नाही. जसं हिंदीत असतं.”

यानंतर तो सांगतो, “आपण या कास्टिंग हब किंवा कास्टिंग दिग्दर्शकाकडे आपली कामाची माहिती देतो, जेणेकरून तो पुढच्या प्रोजेक्ट्ससाठी आपली नावं सुचवतो. तो माणूस दहा दिग्दर्शकांना त्याबद्दल सांगतो. पण आपल्याकडे तशी काही पद्धतच नाही. आपल्याकडे निर्माता येतो, दिग्दर्शक येतो… त्यांच्या ओळखीतले चार-पण जण घेऊन सिनेमा काढतो. तो सिनेमा कधी येतो; कधी जातो कळतसुद्धा नाही.”

यापुढे चेतनने सांगितलं, “मला ज्या दिग्दर्शकांबरोबर काम करायचं आहे, त्यांना येत्या काळात मी संपर्क करेन. एखाद्या दिग्दर्शकाकडे काम मागायला जाताना थेट न जाता, मी काहीतरी बरं काम करून जाईन. ज्यामुळे त्याला मी काही ऐरा-गैरा नाही असं वाटेल. म्हणून मी आतापर्यंत काही लोकांना संपर्कच साधलेला नाही. कारण मला माझी बरी कामं घेऊन त्याच्याकडे जायचं आहे की, मी हे हे काम केलं आहे. यापुढे हे हे काम करू शकतो. पण माझं अजून तितकंसं काम झालेलं नाही, त्यामुळे मी काही दिग्दर्शकांना अजून संपर्कच साधलेला नाही. पण येत्या काळात मी नक्की करेन.”

दरम्यान, चेतनने याआधी काही लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अशातच आता चेतन ‘लपंडाव’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहे. आजपासून चेतनची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यात चेतनसह कृतिका देशमुख आणि रुपाली भोसले या अभिनेत्रीही मुख्य भूमिकांत आहेत.