Laxmi Niwas Fame Actress Talks About Past RelationShip & Break up : आपल्याकडे लग्न जुळवण्यापूर्वी काही ठिकाणी कुंडली पाहिली जाते आणि त्यानुसार गोष्टी ठरवल्या जातात. काहींचा यावर विश्वास असतो; तर काहींचा नसतो. त्याबद्दल ‘लक्ष्मी निवास’फेम अभिनेत्रीनंही तिचं मत व्यक्त करीत यामुळे तिच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाबद्दल तिनं सांगितलं आहे.
अनेकदा कलाकार मंडळी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल व्यक्त होत त्यांच्या रिलेशनशिपबद्दल तसेच प्रेमकहाणीबद्दल सांगताना दिसतात. अशातच ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री अमृता देशमुखनंही नुकतंच तिच्या भूतकाळातील रिलेशनशिपबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिनं तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगाबद्दल सांगितलं.
अमृता देशमुखने केलं प्रसाद जवादेचं कौतुक
‘सर्व काही’ला दिलेल्या मुलाखतीत अमृतानं तिचा नवरा अभिनेता प्रसाद जवादेला भेटण्यापूर्वीच्या तिच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली, “प्रसादला भेटेपर्यंत माझी ही समस्या होती की, मुलांना कमिटमेंटची काय अडचण आहे, जी मला मिळत नव्हती. प्रसाद हा पहिला मुलगा होता, तो कमिटमेंटला घाबरत नव्हता.”
अमृता पुढे म्हणाली, “मी एका रिलेशनशिपमध्ये होते. पण त्याचं पुढे काहीच झालं नाही. त्याचं कारण कुंडली होतं, जे खूपच अनपेक्षित होतं. जेव्हा तुमचा एकमेकांबरोबर दोन-अडीच वर्षांचा सहवास असतो, एकमेकांना तुम्ही जाणून घेता, सगळं गुण-दोष जाणून घेता तेव्हा एवढं करूनही ग्रह ठरवणार असतात की, तुम्ही एकत्र राहणार की नाही?”
कुंडलीबद्दल अभिनेत्री म्हणाली, “मला या गोष्टीबद्दल फक्त कुतूहल वाटतं; पण आता जेव्हा प्रसाद आणि मी ठरवलं होतं की, आम्ही एकमेकांबरोबर राहणार आहोत. आमचं प्रेम आहे एकमेकांवर तेव्हा आम्ही पत्रिका वगैरे पाहिली नाही. कारण- आपल्या विचारांशी आपणच का खेळायचं. नंतर या गोष्टी आपल्या डोक्यात राहतात आणि जेव्हा काही घडतं तेव्हा आपणही काही वेळेला विचार करू लागतो की, खरंच माझ्यामुळे होतंय का हे? त्यांनी आपल्याला सांगितलं होतं आणि आता तेच घडतंय वगैरे… त्यापेक्षा जर एकमेकांबरोबर राहायचं ठरवलं आहे आणि माहितीये की, चढ-उतार काय आयुष्यात येणारच आहेत. मग कशाला ग्रह वगैरे गोष्टी हव्यात.”
अमृताने पुढे सांगितलं, ” ‘बिग बॉस’मध्ये जाण्यापूर्वी ३-४ वर्षांआधी हे घडलेलं. मी खूप उशिरा रिलेशनशिपमध्ये आले. वयाच्या २२-२३ व्या वर्षी माझा पहिला बॉयफ्रेंड होता, ज्याला मी माझा पती परमेश्वरच मानलं होतं; पण तसं काही घडलं नाही. पण, नंतर मला जाणवलं की, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. नंतर माझ्या आई-वडिलांनी मला अमृता तू आता यातून बाहेर आली आहेस, तर तुझं नाव आपण मेट्रीमोनियल साईटवर टाकूयात का? असं विचारलं. तेव्हा मलाही काही अडचण नव्हती. मी डेटिंग अॅपवरपण होते; पण मुलं माझ्यावर हसायची की, इथे तुला कमिटमेंट वगैरे हवीये. त्यामुळे तिथे काही झालं नाही आणि तुम्हाला एखादी व्यक्ती भेटणार असेल, तर ती कुठेही भेटू शकते.”