‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत जातेय. प्रवाह परिवाराच्या या दिमाखदार सोहळ्यात यंदा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करणाऱ्या अशोक सराफ यांच्या सन्मानासाठी महेश कोठारे, वर्षा उसगांवकर, निशिगंधा वाड, निवेदिता आणि संपूर्ण सराफ कुटुंब उपस्थित होतं. या खास प्रसंगी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची उणीव सर्वांनाच भासत होती. त्याच क्षणी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आभासी फोन आला आणि सारेच गहिवरले.

लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या जोडीने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. या दोघांच्या ‘दोस्ती’ला सर्व स्तरांतून प्रेम मिळालं. मात्र, आजारपणामुळे १६ डिसेंबर २००४ रोजी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जगाचा निरोप घेतला.

लक्ष्मीकांत बेर्डेंचा आभासी फोन…

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आभासी फोनवर आवाज ऐकताच अशोक सराफ यांचे डोळे पाणावले होते. या आभासी फोनमधला संवाद काहीसा असा होता. “हॅलो.. हॅलो…अशोक. धनंजय माने इथेच राहतात का? धनंजय माने फक्त इथे राहत नाहीत, तर ते इथे राज्य करतात. अरे आपण जवळपास ५० चित्रपट एकत्र केले. तुझ्यासारखा ॲक्शन आणि रिॲक्शन देणारा दुसरा कलाकार मी माझ्या कारकीर्दीत तरी नाही बघितला. तुझा आज होणारा सन्मान बघून डोळे भरुन आले बघ. आपला मित्र आज एवढ्या उंचीवर पोहोचला हे ऐकून आणि बघून आनंदाने उर भरुन आला. लोकं आकाशात तारे बघतात. मी आकाशातून जमिनीवरचा अशोक नावाचा तारा रोज बघत असतो. तुझ्यासारखा अभिनेता, सच्चा माणूस आणि दिलदार मित्र कुणी नाही. हा लक्ष्या या अशोकशिवाय नेहमीच अपूर्ण राहील. अशोक, माफ कर हं…एवढ्या वर्षांची सवय आहे अशोक म्हणायची. पण, आता तू फक्त अशोक राहिला नाही आहेस. पद्मश्री, महाराष्ट्रभूषण अशोक सराफ झाला आहेस. अशोक आज तू घरी जाताना पाऊस पडला, तर तुझ्या गाडीची काच खाली करुन हात बाहेर काढ. हातावर पाण्याचे थेंब पडले तर ते माझे आनंदाश्रू आहेत असं समज. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तूला खूप खूप शुभेच्छा अशोक. येतो…”

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लेखक चिन्मय कुलकर्णी आणि मोहित कुंटेच्या लेखणीतून हा हळवा क्षण रेखाटण्यात आला आहे. हा हळवा क्षण प्रेक्षकांना १६ मार्चला ‘स्टार प्रवाह’वर पाहायला मिळणार आहे.