Madhura Velankar on Shivaji Satam: ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांनी फक्त मराठीतच काम केले असे नाही, तर त्यांनी हिंदी सिनेमातदेखील कामं केली आहेत. त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत.
सीआयडी या गुन्हेगारीवर आधारित मालिकेतील त्यांची भूमिकादेखील प्रचंड गाजली. एसीपी प्रद्युम्न या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. १९९८ साली सीआयडी हा शो सुरू झाला.
२०१८ पर्यंत हा कार्यक्रम अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. मात्र, हा शो संपल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांना दु:ख झाल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. २०२५ ला सीआयडीचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
“डोळ्यांत पाणी…”
आता शिवाजी साटम एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांची सून मधुरा वेलणकर साटमने त्यांच्याबद्दल एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे. मधुराने नुकतीच लोकशाही फ्रेंडलीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “मी, माझा नवरा, मुलगा आणि माझे सासरे एकत्र राहतो, त्यामुळे अनेकदा आम्ही चित्रपट पाहतो, त्याच्यावर चर्चा करतो. माझ्या सासऱ्यांना खाण्याची खूप आवड आहे, त्यामुळे आम्हाला वेगवेगळे पदार्थ करून बघायला आवडतात. त्यांना त्यातलं कळतं. अगदी चार-चौघांसारखंच आमचं आयुष्य आहे.”
पुढे अभिनेत्री म्हणाली, “एक अभिनेत्री किंवा प्रेक्षक म्हणून सांगायचं तर आम्हीही सीआयडी बघत वाढलेलो आहोत. जेव्हा सीआयडीचा दुसरा सीझन आला, तर आम्ही तेवढेच आतुर होतो. त्यांची एक फिल्मी एन्ट्री झाली. ती एन्ट्री होत असताना डोळ्यांत पाणी आलं, कारण त्या माणसाने इतक्या वर्षांमध्ये ते कमवलं आहे. इतकं मेहनतीने, इतकं प्रामाणिकपणे कमवलं आहे. आम्ही सिग्नलला वळताना पोलिससुद्धा त्यांना सॅल्युट करतात, इतकं त्यांच्या त्या सीआयडीमधील पात्राचा प्रभाव आहे. त्याचबरोबर त्यांनी उत्तरायण, एक होती वादी, दे धक्का यांमध्ये विविध भूमिकादेखील साकारल्या आहेत.”
मधुरा पुढे म्हणाली, ” त्यामुळे मी आई-बाबा आणि सासरे या तिघांबद्दल एक सांगेन की तिघंही अतिशय प्रामाणिकपणे मेहनत करणारे आहेत. आजही त्यांना कामात आनंद मिळतो. काहीतरी नवीन करू पाहणारे ते आहेत. पंचाहत्तरी ओलांडल्यानंतरही त्यांना हे करावसं वाटतं आहे, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.”