Maharashtrachi Hasyajatra Fame Actor Nikhil Bane : मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी यंदाचा गणेशोत्सव कोकणात आपल्या मूळ गावी साजरा केल्याचं पाहायला मिळालं. छाया कदम, तितीक्षा तावडे, अंशुमन विचारे, प्रसाद खांडेकर असे अनेक कलाकार गणेशोत्सवासाठी कोकणात गेले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी लोकप्रिय अभिनेता निखिल बने गौरी-गणपतीचा सण साजरा करण्यासाठी कोकणात पोहोचला आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरांत लोकप्रिय झालेलं नाव म्हणजेच अभिनेता निखिल बने. विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्याने सर्वांनाच भुरळ घातली आहे. हास्यजत्रेमुळे त्याला एक वेगळी ओळख मिळाली. गणेशोत्सव आणि शिमग्याला व्यग्र शेड्युलमधून वेळ काढत निखिल आवर्जून गावाला जातो. निखिलचं गाव चिपळूणमध्ये आहे. यंदाच्या गणेशोत्सवाची झलक अभिनेत्याने त्याच्या व्हिडीओमध्ये शेअर केली आहे.

चिपळूणमधील कापरे-बनेवाडी हे निखिलचं गाव आहे. कोकणातील प्रत्येक गावात अतिशय पारंपरिक पद्धतीने प्रत्येक सणवार साजरे केले जातात. निखिलने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कोकणातील शक्तीतुरा कार्यक्रमाची झलक चाहत्यांना पाहायला मिळत आहे. शक्तीतुरा ही कोकणातील एक पारंपरिक आणि प्रसिद्ध लोककला आहे. शक्तीतुरा ही लोककला प्रामुख्याने गणेशोत्सवात सादर केली जाते. याला काही प्रांतात जाखडी नृत्य असंही म्हणतात. ‘शक्ती’ म्हणजे पार्वतीचं रूप तर ‘तुरा’ म्हणजे शंकराचं रूप मानलं जातं.

निखिलच्या व्हिडीओमध्ये रात्री घराच्या अंगणात ढोलकीच्या तालावर शक्तीतुरा सादर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. निखिलने या व्हिडीओला ‘आपली कोकणची कला’ असं कॅप्शन दिलं आहे. तसेच या व्हिडीओला अभिनेत्याने “गणपती बाप्पा मोरया, कोकण-चिपळूण, बनेवाडी- शक्तीतुरा” हे हॅशटॅग वापरले आहेत.

निखिलच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत अभिनेत्याने कोकणी संस्कृतीची झलक दाखवल्याने त्याचं विशेष कौतुक केलं आहे. दरम्यान, हास्यजत्रेमुळे निखिलला घराघरांत ओळखलं जातं. मात्र, एवढी लोकप्रियता मिळवूनही त्याने त्याचा साधेपणा जपला आहे. तो अनेकदा ट्रेन, एसटीच्या गर्दीतून प्रवास करत कोकणात पोहोचला आहे.