Maharashtrachi Hasya Jatra Fame Actors Dance Video : दरवर्षी जन्माष्टमीचा उत्सव संपूर्ण भारतात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. छोट्या पडद्यावरील मालिका तसेच रिअ‍ॅलिटी शोमध्ये देखील प्रत्येक सणवार जल्लोषात साजरे केले जातात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर नुकताच सगळ्या कलाकारांनी एकत्र मिळून दहीहंडी उत्सव साजरा केला आहे. यावेळी कलाकारांनी मिळून धमाल केल्याचं पाहायला मिळालं आहे. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

नम्रता संभेराव, शिवाली परब, चेतना भट, दत्तू मोरे, निखिल बने, अरुण कदम, प्रसाद खांडेकर, प्रियदर्शिनी इंदलकर असे सगळे कलाकार यावेळी उपस्थित होते. हास्यजत्रेच्या कलाकारांनी या दहीहंडी उत्सवात विविध गाण्यांवर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.

नम्रता संभेरावने संजू राठोडच्या सर्वत्र व्हायरल होणाऱ्या ‘एक नंबर, तुझी कंबर…हाय चाल शेकी शेकी हाय’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. नम्रताला या गाण्यावर डान्स करताना शिवाली परब, निखिल बने, चेतना भट यांनी साथ दिली आहे.

संजू राठोडचं ‘शेकी’ गाणं अल्पावधीतच सोशल मीडियावर लोकप्रिय ठरलं होतं. एप्रिल २०२५ मध्ये हे गाणं प्रदर्शित झालं आणि त्यानंतर सामान्य लोकांपासून बॉलीवूडच्या मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाला या गाण्याची भुरळ पडल्याचं पाहायला मिळालं. या गाण्यात संजूसह लोकप्रिय अभिनेत्री ईशा मालवीय सुद्धा झळकली आहे. हास्यजत्रेच्या कलाकारांनी विशेषत: नम्रता संभेरावने ‘शेकी’ गाण्यावर डान्स करताना मूळ गाण्यातील हूकस्टेप हुबेहूब केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या या कलाकारांचा डान्स व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

‘शेकी’ गाण्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं, तर हे गाणं स्वत: संजू राठोडने गायलं असून या गाण्याची संगीत निर्मिती G-Spark ने केली आहे. यापूर्वी संजूची ‘गुलाबी साडी’, ‘नऊवारी साडी’, ‘काली बिंदी’ अशी बरीच गाणी सोशल मीडियावर सुपरहिट ठरली आहेत.

दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो ‘सोनी मराठी’ वाहिनीवर सोमवार आणि मंगळवार रात्री ९ वाजता प्रसारित केला जातो. या शोचे चाहते केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात आहेत.