Marathi Actor Anshuman Vichare : मराठी सिनेविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे जोडीदार कलाविश्वापासून दूर आहेत. आपल्या आवडत्या कलाकारांचे जोडीदार नेमकं काय करतात? ते कोणत्या प्रोफेशनमध्ये सक्रिय आहेत हे प्रत्येक चाहत्याला जाणून घ्यायचं असतं. सध्या एका लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीने शेअर केलेला फोटो सर्वत्र चर्चेत आला आहे. या फोटोमुळे अभिनेत्याची पत्नी व्यवसायाने वकील असल्याचं स्पष्ट होत आहे.

‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘फू बाई फू’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अशा विनोदी कार्यक्रमांमुळे अभिनेता अंशुमन विचारे घराघरांत लोकप्रिय झाला. आपल्या दमदार विनोदशैलीने अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. अंशुमन मनोरंजन विश्वात सक्रिय असला, त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असला तरीही त्याची पत्नी कलाक्षेत्रापासून दूर आहे. अंशुमनच्या पत्नीचं नाव आहे पल्लवी विचारे.

पल्लवी विचारे प्रोफेशनने वकील व समुपदेशक आहे. पल्लवी आणि अंशुमन यांचे कौटुंबिक Vlogs प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतात. नुकतेच हे दोघंही गणपतीच्या सणाला आपल्या लाडक्या लेकीसह कोकणात गेले होते. यादरम्यान, पल्लवीने गावच्या गणेशोत्सवाची झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. अंशूमन मनोरंजनसृष्टीत विविध कामांमध्ये व्यग्र असताना, पल्लवी घरची जबाबदारी, नोकरी-काम हे सगळं उत्तमप्रकारे सांभाळते.

अंशुमन व पल्लवी यांची लेक अन्वी सुद्धा सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. तिचे क्युट व्हिडीओ नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेतात. प्रोफेशनने वकील असल्याने पल्लवीने नुकताच मुंबई उच्च न्यायालयाजवळील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स करत पल्लवीचं कौतुक केलं आहे.

मुंबई उच्च न्यायलयाजवळील फोटो शेअर केल्यावर त्यांच्या अनेक चाहत्यांना पहिल्यांदाच पल्लवी प्रोफेशनने वकील असल्याचं समजलं. पल्लवीने एका मुलाखतीत त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला होता.

पल्लवी म्हणाली होती, “माझी एलएलबीची परीक्षा चालू होती. शेवटचा पेपर झाला आणि मी माझ्या घरी सांगितलं. ५ जूनला आमचं लग्न होतं आणि मी १ जूनला घरी सांगितलं की, मी लग्न करतेय. माझ्या घरी लग्नाबद्दल काहीही माहीत नव्हतं; पण आमचं ठरलं होतं. सुधाकर चव्हाण म्हणून अंशुमनचे मित्र होते. मला ते वडिलांसारखे होते. त्यांनीच आमचं लग्न लावून दिलं. त्यांनी आम्हाला मानसिक, आर्थिक मदत केली होती.”