कोकणात फिरायला जायचं, निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यायचा हे प्रत्येकाच्या बकेट लिस्टमध्ये असतं. गेल्या काही महिन्यांपासून अनेक मराठी कलाकार सुद्धा व्यग्र शेड्युलमधून ब्रेक घेऊन कोकण भ्रमंती करायला गेल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय मराठी कलाविश्वात सक्रिय असणाऱ्या काही कलाकारांचं मूळ गाव सुद्धा कोकणात आहे. तितीक्षा तावडे, निखिल बने, प्रसाद खांडेकर या कलाकारांच्या गावची झलक प्रेक्षकांना नेहमीच सोशल मीडियावर पाहायला मिळते. आता या पाठोपाठ मनोरंजनसृष्टीतील आणखी एक लोकप्रिय अभिनेते कोकण फिरण्यासाठी आपल्या कुटुंबीयांसह रत्नागिरीला पोहोचले आहेत.
आपल्या विनोदी शैलीने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजेच अरुण कदम. त्यांना लाडका दादूस या नावानेही ओळखलं जातं. गेल्या कित्येक वर्षांपासून अरुण कदम विविध चित्रपट आणि लोकप्रिय विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहेत. अरुण कदम जितके त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात, तितकेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. सध्या अरुण कदम यांच्या लेकीने शेअर केलेल्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या व्हिडीओमध्ये अरुण कदम, त्यांची पत्नी, लेक आणि त्यांचा नातू असे सगळे कुटुंबीय मिळून कोकणात फिरायला गेल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांची लेक सुकन्याने या व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सुकन्याच्या व्हिडीओमध्ये सुरुवातीलाच रत्नागिरी स्थानकाची झलक पाहायला मिळते. यानंतर अभिनेत्रीने अरुण कदम व अथांग यांचे बरेच फोटो व्हिडीओमध्ये शेअर केले आहेत. या व्हिडीओला सुकन्याने, “कोकण फक्त फिरण्याची जागा नसून मन शांत करण्याचं ठिकाण आहे” असं कॅप्शन दिलं आहे. नेटकऱ्यांनी सुद्धा अरुण कदम यांच्या कोकण ट्रिपचा व्हिडीओ पाहून कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, अरुण कदम यांची मुलगी सुकन्याचा विवाहसोहळा २०२१ मध्ये पार पडला होता. ऑगस्ट २०२३ मध्ये तिने गोंडस बाळाला जन्म दिला. यानंतर अरुण कदम यांच्या नातवाचं थाटामाटात बारसं करण्यात आलं होतं. त्याचं नाव आहे अथांग. सुकन्या नेहमीच अथांगबरोबरचे गोड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
