‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीराने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकारांना संधी मिळाली. शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकर, ओंकार राऊत, निखिल बने, पृथ्वीक प्रताप असे बरेच कलाकार यामुळे प्रसिद्धीझोतात आले. यापैकी घराघरांत लोकप्रिय झालेलं नाव म्हणजे भांडुपचा निखिल बने. विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्याने सर्वांनाच भुरळ घातली आहे.
लागोपाठ सुट्ट्या, शिमगा, गणपतीचा सण आला की, निखिल गावची वाट धरतो. याआधी गावच्या पालखी सोहळ्यासाठी तो ट्रेन, एसटीच्या गर्दीतून प्रवास करत कोकणात पोहोचला होता. त्याचा हा साधेपणा प्रत्येकाला भावतो. निखिल आता पुन्हा एकदा त्याच्या गावी चिपळूणला गावच्या पूजेसाठी गेला होता. यादरम्यान त्याला गावचा पहिला पाऊस अनुभवता आला. याचा फोटो आणि कोकणातील गावची संपूर्ण झलक निखिलने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
निखिल पहाटे सुटणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसने गावी निघाला. या गाडीत प्रचंड गर्दी असल्याचं त्याने आवर्जुन सांगितलं. जनशताब्दीतून उतरल्यावर पुढे गाडीने प्रवास करत निखिल आपल्या गावी पोहोचला. वाटेत उकाड्यामुळे त्याने गावच्या आंब्याचा रस प्यायला घेतला. असा प्रवास करता-करता निखिल अखेर गावी पोहोचला. गावी तो खास पूजेसाठी गेला होता.
निखिलने गावच्या बायका एकत्र येऊन कशा जेवण बनवतात, जेवणाची पंगत, गावचं भजन याची झलक या व्हिडीओद्वारे शेअर केली आहे. याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निखिलला गावी पहिला पाऊस अनुभवायला मिळाला. पहिल्या पावसाचा फोटो निखिलने इन्स्टाग्रामवर सुद्धा शेअर केला होता. “गाव + पहिला पाऊस = सुख” असं कॅप्शन अभिनेत्याने या पोस्ट दिलं आहे. तसेच नुकत्याच शेअर केलेल्या कोकणातील गावच्या व्हिडीओवर निखिलने “पुन्हा चिपळूण प्रवास” असं लिहिलं आहे. कारण, काही दिवसांपूर्वीच अभिनेता गावी जाऊन आला होता.
हेही वाचा : Video : ‘मर्डर’ फेम मल्लिका शेरावतसमोर गौरव मोरेने केला बेली डान्स! अभिनेत्री झाली थक्क, म्हणाली…
दरम्यान, निखिल बने याने या व्हिडीओच्या माध्यमातून गावच्या घराची संपूर्ण झलक त्याच्या चाहत्यांना दाखवली आहे. सोशल मीडियावर त्याने शेअर केलेल्या या व्हिडीओचं कौतुक करण्यात येत आहे. याशिवाय त्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बॉईज ४’ चित्रपटात निखिल झळकला होता.