Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar Son : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे चाहते जगभरात आहेत. या शोमुळे अनेक नवोदित कलाकारांना लोकप्रियता मिळाली. तर, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, समीर चौघुले यांसारख्या नावाजलेल्या कलाकारांचा सुद्धा या शोमुळे एक वेगळा चाहतावर्ग तयार झाला. हास्यजत्रेतील प्रत्येक कलाकारावर चाहते मनापासून प्रेम करतात.
अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद खांडेकर वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही पोस्ट प्रसादने आपल्या लाडक्या लेकासाठी शेअर केली आहे.
आपल्या कुटुंबाबरोबरचे विशेषत: पत्नी अन् मुलाबरोबरचे विविध फोटो प्रसाद सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असतो. प्रसादप्रमाणे त्याचा मुलगा श्लोकही नेहमीच चर्चेत असतो. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत श्लोकनेही अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. ‘एकदा येऊन तर बघा’ या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित सिनेमात श्लोकने लहानशी भूमिका साकारली होती. आता श्लोकने आंतरशालेय डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
प्रसाद लिहितो, “भाई… श्लोकची आयुष्यातील पहिली ट्रॉफी आली. ती पण थेट पहिल्या नंबरची. लै खुश आहे आपण… ए बजाव! आंतरशालेय डान्स स्पर्धेत पहिला क्रमांक आला…”
प्रसाद खांडेकरने शेअर केलेल्या पोस्टवर समीर चौघुले आणि नम्रता संभेराव या कलाकारांनी कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय चाहत्यांनी सुद्धा श्लोकवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, प्रसाद खांडेकर नेहमीच त्याची पत्नी अल्पा आणि मुलगा श्लोकबरोबर सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. याशिवाय तो अलीकडेच ‘गाडी नंबर १७६०’ आणि ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या सिनेमात झळकला होता.