Maharashtrachi Hasyajatra Priyadarshini Indalkar : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. हा कॉमेडी शो जगभरात लोकप्रिय आहे. अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरला सुद्धा या शोमुळे घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. मराठी नाटक असो किंवा सिनेमा प्रियदर्शिनीने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे.
प्रियदर्शिनीला सिनेमांमध्ये नेहमीच विविध धाटणीच्या भूमिका साकारायला आवडतात. सध्या ही अभिनेत्री व्हिएतनाम फिरायला गेली आहे. व्हिएतनाममधील विविध जागा, कॅफे, रेस्टॉरंट, तेथील संस्कृती, स्ट्रीट फूड या सगळ्याची झलक अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे.
प्रियदर्शिनीने ‘हो ची मिन्ह सिटी’ या शहरातील काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. व्हिएतनाममध्ये गोगलगाय ( Snails ) खाणं खूपच सामान्य आहे. याठिकाणी Snail पासून बनवलेले विविध पदार्थ रस्त्याच्या कडेला ( स्ट्रीट फूड ) जागोजागी विकले जातात. याशिवाय विविध रेस्ट्रॉरंटमध्ये सुद्धा गोगलगायीपासून बनवलेले पदार्थ सर्व्ह केले जातात. व्हिएतनाम आणि थायलंड फिरायला गेल्यावर अनेकांनी पहिल्यांदाच हे पदार्थ खाल्ले आहेत. प्रियदर्शिनीच्या बाबतीत सुद्धा असंच काहीसं झालं.
व्हिएतनाम फिरायला गेलेल्या प्रियदर्शिनीने पहिल्यांदाच गोगलगाय खाल्ली. याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने ‘Tried Snail’ असं लिहिलं आहे. हा पदार्थ अभिनेत्रीच्या देखील पसंतीस उतरला आहे. कारण, पुढील स्टोरीमध्ये प्रियदर्शिनीने गोगलगायीपासून बनवलेल्या पदार्थाचा फोटो शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये “होय, मला आवडलंय” असं लिहिलं आहे. याशिवाय अभिनेत्रीने मँगो शेकचा आस्वाद देखील घेतला आहे.

प्रियदर्शिनीचे व्हिएतनाम ट्रिपचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीने याठिकाणी विविध जागांना भेट दिली आहे. दरम्यान, अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर नुकतीच ती ‘गाडी नंबर १७६०’ या सिनेमात झळकली. याशिवाय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून सुद्धा अभिनेत्री प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे.