सध्या महागाई खूप वाढत आहे. काही दिवसांमध्ये अनेक भाज्यांचे दर गगनाला भिडले. आता टोमॅटोच्या किमतीमध्येही मोठी वाढ झाली आहे. सध्या टोमॅटो १२० ते १५० रुपये किलो या दराने मिळत आहेत. टोमॅटो इतके महाग झाल्याने नागरिकांप्रमाणेच अनेक कलाकारांच्याही भुवया उंचावल्या.
टोमॅटोच्या या वाढलेल्या किंमतीवर अनेक कलाकारांनी आपापल्या शैलीत प्रतिक्रिया दिल्या. तर आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता श्रमेश बेटकर त्याच्या विनोदी यंदाजात या महागाईवर व्यक्त झाला. टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीबद्दल त्याने शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी आता चर्चेत आली आहे.
आणखी वाचा : “महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला लागणार ब्रेक, कारण सांगत कलाकार म्हणाले…
श्रमेश बेटकर आतापर्यंत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. त्याच्या उत्स्फूर्ततेचं आणि विनोदाच्या टायमिंगचं नेहमीच कौतुक झालं. सोशल मीडियावर सक्रिय राहून तो त्याला वाटणाऱ्या गोष्टीच्या चाहत्यांशी शेअर करत असतो. तर आता टोमॅटोच्या किंमतीवर तो व्यक्त झाला आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक फोटो शेअर करत लिहिलं, “सकाळपासून एकच गोष्ट कळत नाहीये, टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू की बँकेत?” याचबरोबर त्याने महागाई हा हॅशटॅगही वापरला.

फक्त श्रमेशच नाही तर याआधी अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडेही टोमॅटोच्या महागलेल्या किंमतीवर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून व्यक्त झाले. तर दुसरीकडे अभिनेत्री राखी सावंतही टोमॅटोची किंमत वाढल्यामुळे नाराज झाली. महागाईबद्दल कलाकारांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर नेटकरीही विविध कमेंट्स करत व्यक्त होताना दिसत आहेत.