Arun Kadam Reveals Daughters field: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. यामध्ये प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, प्रियदर्शिनी इंदालकर असे अनेक कलाकार आहेत. यामध्ये अरुण कदम हे नाव प्रामुख्याने घेतले जाते. अभिनेते अरुण कदम त्यांच्या विनोदाच्या शैलीसाठी लोकप्रिय आहेत.
अरुण कदम यांची लेक कोणत्या क्षेत्रात करते काम?
नुकतीच अरुण कदम यांनी त्यांची लेक सुकन्यासह ‘लोकशाही फ्रेंडली’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अरुण कदम यांनी सुकन्या अभिनय क्षेत्रात काम का करत नाही, यावर वक्तव्य केले. अरुण कदम म्हणाले, “ती सुंदर आहे, ती नायिका होऊ शकते. पण, मला असं वाटत होतं की तिने या क्षेत्रात येऊ नये. पण, ती अभिनेत्री नसली तरी उत्तम डान्सर आहे. ती कॉलेजमध्ये कोरिओग्राफर म्हणून काम करते. मला लहानपणीच हे समजलं होतं.
“लहानपणीच तिचा डान्स पाहून असं वाटलं होतं की भविष्यात माझी मुलगी कोणाच्या मागे नाही नाचली पाहिजे, तर तिच्या तालावर लोक नाचले पाहिजेत. मग आम्ही तिला भरतनाट्यम शिकवलं; तर तिच्याकडे अभिनयाचं कौशल्य असेल किंवा नसेल ते माहीत नाही, पण तिच्याकडे डान्सचं कौशल्य आहे. सध्या ती ग्राफिक डिझाइनर आहे.”
सुकन्या म्हणाली, “मी जयहिंद कॉलेजला शिक्षण घेत होते. बीएस्सीचं पहिलं वर्ष शिक्षण घेतलं. त्यावेळी मला असं जाणवलं, मला हे आवडत नाही. मला नंतर समजलं की अप्लाइड आर्ट हे क्षेत्र आहे, त्यासाठी काही परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर मी माझ्या आई-वडिलांना त्याबद्दल सांगितलं. मला त्यामध्ये करिअर करायचं आहे, असं मी त्यांना समजावून सांगितलं. त्यावर आई म्हणाली की घरात एक कलाकार आहे, मी त्याचा संघर्ष पाहिला आहे. मला घरात दुसरा आर्टिस्ट नको. पण, बाबांनी सांगितलं की तुला जे करायचं आहे ते कर, माझ्याकडून पाठिंबा आहे. त्यांनी मला त्यावेळी पाठिंबा दिला, म्हणून आज मी ग्राफिक डिझाइनर आहे.”
अरुण कदम पुढे म्हणाले की, पालकांनी आपल्या मुलांचा कल कशात आहे हे ओळखणे गरजेचे आहे. दरम्यान, अरुण कदम यांनी अनेक मराठी चित्रपटांतदेखील काम केले आहे. ‘खेळ मांडला’, ‘येरे येरे पैसा’, ‘धावाधाव’, ‘जस्ट गंमत’, ‘सुपारी’, ‘दिल तो बच्चा है जी’, अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.