‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम गेल्या सहा वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे. या कार्यक्रमाचा प्रेक्षक फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून जगभरात आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची चर्चा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे होतं असते. तसंच या कार्यक्रमातील कलाकार देखील नेहमी चर्चेचा विषय असतात. सध्या अभिनेत्री नम्रता संभेरावने प्रसाद खांडेकरसाठी शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आज अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रसाद खांडेकरचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने नम्रता संभेरावने त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. नम्रताने प्रसादबरोबरचा एक फोटो शेअर करत लिहिलं आहे, “वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा पश्या…१० वर्षे आपल्या मैत्रीला झाली…एक चालता, फिरता, बोलका, हळवा, मेहनती, जिद्दी, प्रेमळ, रागिष्ट, रुसलेला, हसरा, रडका, आशावादी, प्रचंड उर्जा आणि दर्जा असलेला हा वाघ मी गेली १० वर्षे बरोबर घेऊन फिरतेय. या वाघाचं वैशिष्ट्य असं आहे की, हा वाघ स्वतःबरोबर इतरांची उपासमार होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतो. आम्हाला कळपात राहायला आवडतं. हा चश्मेवाला वाघ तुम्हाला शोधून सापडणार नाही.”

पुढे नम्रताने लिहिलं, “जो करेंगे साथ मे, एकत्र यशस्वी होऊ ही भावना खूप कमी जणांच्या मनात येते. त्यापैकी हा माझा दोस्त अशा विचारांचा आहे . उत्तम व्यक्तिमत्व, अत्यंत टॅलेंटेड, प्रचंड वर्कहोलिक आणि गोड माणसाचा, म्हणजे माझ्या मित्राचा पश्याचा आज वाढदिवस. आयुष्यभर असंच हसत राहा, हसवत राहा, भांडत राहा, प्रेम करत राहा, मजा करू एकत्र काम करू अवॉर्ड्स घेऊ प्रोत्साहन देत राहू आणि असेच कायम बरोबर राहू. तुझ्याबरोबर भांडल्याशिवाय मी जगू शकत नाही. हॅप्पी बर्थडे पश्या..खूप खूप प्रेम.”

नम्रता संभेरावरच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह अनेक कलाकारांनी प्रसाद खांडेकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच प्रसादने देखील प्रतिक्रिया दिली आहे. प्रसाद म्हणाला, “सतत भांडत राहूया आणि प्रेम करत राहूया.”

प्रसाद खांडेकरची प्रतिक्रिया
प्रसाद खांडेकरची प्रतिक्रिया

दरम्यान, नम्रता आणि प्रसाद ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ व्यतिरिक्त ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकात पाहायला मिळत आहे. त्यांच्या या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रसाद खांडेकर लिखित, दिग्दर्शित ‘थेट तुमच्या घरातून’ नाटकात नम्रता व्यतिरिक्त भाग्यश्री मिलिंद, भक्ती देसाई, ओंकार राऊत, प्रथमेश शिवलकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.