Marathi Actor Angry On Ghodbunder Road Condition : मुंबईतील रस्त्यांची अवस्था हा कायमच चर्चेतला मुद्दा आहे. दरवर्षी या रस्त्यांवर लाखो रुपये खर्च केले जातात. पण, या रस्त्यांची अवस्था मात्र ‘जैसे थे’च असते. अनेक सामान्य नागरीक या खराब रस्त्यांतूनच आपली वाट शोधत कामाच्या ठिकाणी पोहोचत असतात. त्यात ठाणे-घोडबंदर या रोडची अवस्था तर खूपच वाईट आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांना सगळेच वैतागले आहेत.
रस्त्यावरील खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका रोज सामान्य नागरिकांना बसतो. केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर अनेक कलाकार मंडळीसुद्धा या खड्ड्यांचा सामना करताना दिसतात. ठाणे-घोडबंदर या रोडच्या दुरवस्थेबद्दल आजवर अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. रस्त्यांची झालेली दुर्दशा पाहून त्यांनी सरकारला जाब विचारला आहे.
अशातच आता आणखी एका मराठी अभिनेत्याने या रस्त्यावरील खड्ड्यांचा व्हिडीओ शेअर करीत थेट नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांना थेट प्रश्न विचारला आहे. तसेच त्याने या रस्त्याच्या कारभाराबद्दल टीकासुद्धा केली आहे. मराठी अभिनेता आस्ताद काळे हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. सोशल मीडियाद्वारे तो त्याचे राजकीय, सामाजिक विचार अगदी मुक्तपणे व्यक्त करताना दिसतो. अशातच त्याचा ठाणे-घोडबंदर रोडच्या दुरवस्थेचा व्हिडीओ चर्चेत आहे.
या व्हिडीओत आस्ताद असं म्हणतो, “हा बघा… हा आहे, Golden Quadrilateral रोडचा एक भाग. घोडबंदर रोडची ही अवस्था अजून किती वर्षे असणार आहे गडकरीसाहेब… महाराष्ट्र सरकार… मुख्यमंत्री साहेब… मिरा-भाईंदर आणि ठाणेमधील नगरसेवक… महानगरपालिका… हे कधी सुधारणार आहे? सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या चालक, इतर वाहतूक करणारे चालक, आम्ही खासगी वाहनचालक, दुचाकी चालवणारे… आम्ही सगळ्या नागरिकांनी अजून किती वर्षे जीव मुठीत घेऊन हा प्रवास करायचा आहे?”
त्यानंतर तो संताप व्यक्त करत म्हणतो, “Golden Quadrilateral असं लिहायला लाज वाटत नाही का? रस्त्यांची ही काय अवस्था आहे? हे कधी सुधारणार? मला उत्तर द्या… मीसुद्धा एक नागरिक आहे. नियमितपणे टॅक्स भरतो. नितीन गडकरी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदेजी… अहो, निदान इभ्रतीचा प्रश्न म्हणून तरी या सगळ्याकडे बघा…”
यापुढे आस्ताद व्हिडीओद्वारे रस्त्याची परिस्थिती दाखवत असं म्हणतो, “हे बघा, खड्ड्यांचा आकार बघा… आता यात माझ्या गाडीचं काय होतंय बघा… मध्यंतरी पाच दिवस हा रोड कामासाठी बंद ठेवणार असल्याचं कानावर आलं होतं. तशी यंत्रसामगीसुद्धा ठेवण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पण, आम्हीसुद्धा विचार केला की, कामासाठी हे सगळं आणून ठेवलं आहे; पण काम तर झालेलंच नाही. पाऊसही आता ओसरला आहे; पण तुमची इच्छाच नाही. कारण- तुम्हाला हे भोगावं लागत नाही. तुम्ही आमच्याच पैशांतून हेलिकॉप्टरनं हिंडता. जरा सुधारा.. स्वत:ला आणि या रस्त्यांनासुद्धा… डोळे उघडा आणि बघा आसपासच्या सामान्य नागरिकांच्या आयुष्यात काय चाललंय…”
आस्ताद काळे इन्स्टाग्राम व्हिडीओ
दरम्यान, आस्ताद यानं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त करीत अभिनेत्याला पाठिंबा दिला आहे. “अगदी योग्य म्हणालात?”, “शहरातील लोकांनीपण ट्रॅक्टर वापरावेत म्हणून असे रोड बनवलेत बहुतेक”, “बैलगाडीचा रस्ता”, “फास्ट टॅग, सीएनजी, ईलेक्ट्रिक एवढ्याच गप्पा करायच्या, त्या महत्त्वाच्या आहेत. बाकी हे खड्डे वगैरे काय दरवर्षी होतातच” अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.