दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने आषाढी वारीचा सोहळा पार पडतो. पांडुरंगाला भेटण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी पंढरपुरात दाखल होत असतात. यंदाच्याही वर्षी अनेक वारकरी या वारीच्या सोहळ्यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. सामान्य वारकऱ्यांबरोबरच अनेक कलाकारांनीसुद्धा यंदाच्या वारीत सहभाग घेतला होता. यंदाच्या वारीत मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार सहभागी झाले होते.
छाया कदम, हार्दिक जोशी, सायली संजीव, सायली पाटील यांसह छोट्या पडद्यावरील मालिकांमधीलही अनेक कलाकार या वारीत सहभागी झाले होते. कलाकारांच्या वारीतील खास क्षण सोशल मीडियाद्वारे पाहायला मिळाले. मात्र यंदाच्या वारीत एका अभिनेत्याची सहभागी होण्याची इच्छा पूर्ण झाली नसून याबद्दल त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. हा अभिनेता म्हणजे अभिजीत केळकर.
अभिजीत केळकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच त्याने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या व्हिडीओसह अभिनेत्याने त्याच्या यंदाच्या वारीत सहभागी न होता आल्याबद्दल भावनाही व्यक्त केल्या आहेत.
या व्हिडीओसह अभिजीतने असं म्हटलं आहे, “काही क्षण शब्दांपलीकडचे असतात. यावर्षी वारीला जायची खूप इच्छा होती; पण काही कारणांमुळे शक्य नाही झालं, यावर्षी पांडुरंगाच्या मनात नाही म्हणून त्याने आपल्याला बोलावलं नाही अशी मी मनाची समजूत काढली. पण त्याच्या मनात काही वेगळं होतं.”
अभिजीत केळकर इन्स्टाग्राम व्हिडीओ
यानंतर त्याने असं म्हटलं, “एकादशीच्या दिवशी माझ्या मित्रांनी मुलुंडमध्ये दिंडीचं आयोजन केलं होतं. त्यात नाटकाच्या प्रयोगाला जायच्या आधी मी सहभागी झालो होतो. त्यात काही छोटी मुलं विठोबा, रखुमाई, तुकाराम महाराज अशा रूपात तयार होऊन आली होती, दिंडीबरोबर चालत होती, कंटाळली होती, दमली होती.”
यानंतर अभिजीत म्हणतो, “मी नाचताना त्यातल्या विठोबाकडे माझं लक्ष गेलं. कारण त्याच्या आईने त्याला उचलून घेतलं होतं. मग मी त्यांना विनंती करून, विठोबाचे थोडे लाड करून त्याला उचलून खांद्यावर बसवलं आणि नाचायला लागलो. हळूहळू त्या विठोबाने माझ्या डोक्यावर डोकं ठेवलं, हाताने माझा चेहरा घट्ट धरला आणि थोड्या वेळाने तो तिथेच विसावला, झोपला. मला पंढरपूरला येणं शक्य नाहीये हे कळल्यावर माऊली स्वतः मला भेटायला आली. माझ्या खांद्यावर बसली आणि काही क्षण विसावली.”
अभिजीतने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याने वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यांच्या खांद्यावर लहान मुलगा असल्याचं पाहायला मिळत आहे. तर अभिनेता त्याला खांद्यावर घेऊन नाचत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स आणि कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे.