Marathi Actror Talk’s About Dadar’s Kabutar Khana : मुंबईच्या दादर परिसरातील कबुतरखान्याचा विषय चर्चेचा मुद्दा ठरत आहे. कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे व त्यांच्या पिसांमुळे श्वसनाचे आजर पसरत असल्याने माणसांसाठी ते अडचणी निर्माण करत आहेत. त्यामुळे बीएमसीने दादरच्या कबुरतरखान्यावर ताडपत्री व शेड घालून कारवाई केली आहे. काही लोकांनी याला विरोध केल्याचं दिसलं. यावर मराठी अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रोष व्यक्त केला आहे.

कबुतरांची वाढत असलेली संख्या त्या परिसरातील माणसांसाठी अडचणीचे कारण ठरत आहे आणि त्याशिवाय कबुतरांमुळे श्वसनाचे आजार होत असल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेने कबुतरखान्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. परंतु, दादर येथील काही रहिवाशांनी त्याला विरोध केल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता अभिनेता अभिजीत केळकरने याबाबत त्याची प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

अभिजीत केळकरची प्रतिक्रिया

अभिजीतने याबाबत म्हटले, “काहीच दिवसांपूर्वी दादरच्या कबुतरखान्याचा हा व्हिडीओ शूट करतानाच माझा भयंकर संताप झाला होता… भूतदया वगैरे सगळं मलाही आहेच, मलाही प्राणी, पक्षी अतिशय प्रिय आहेत; पण कबुतर या पक्षयामुळे श्वसनाचे बरे न होणारे गंभीर विकार, आजार होतात हे सिद्ध झालंय. मुंबई महानगरपालिकेने त्याबाबत वारंवार सचेत करूनही, सूचना देऊनही लोकांना अक्कल येत नाही.”

अभिनेता पुढे म्हणाला, “कबुतर हा कुठल्या एका धर्माचा पक्षी आहे, असे ज्यांना वाटत असेल, त्यांनी त्याला आपल्या घराला जाळ्या लावून, घराच्या आत खुशाल पाळावे… आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कुठल्याही पक्षाने, निदान याचे तरी धार्मिक राजकारण न करता, मुंबई महापालिकेनं जी ताडपत्री, शेड घालून, कारवाई केली आहे, त्यामागे खंबीरपणे उभे राहावे ही कळकळीची विनंती”.

अभिजीतने पोस्टमध्ये पुढे मुंबई महापालिकेला टॅग करीत त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. अभिजीत केळकर सोशल मीडियावर सक्रिय असतो. अनेकदा तो यामार्फत सामाजिक मुद्द्यांवर त्याची प्रतिक्रिया देत असतो.

दरम्यान, अभिजीतच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपटांत काम केले आहे. शेवटचा तो ‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकला होता.