Marathi Actor Shares Post About Road Pathholes : पाऊस आणि पाऊसामुळे पडणारे खड्डे हे समीकरण काय आता नवीन नाही. पावसामुळे सध्या मुंबईतील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीच्या समस्याही होतात. ज्याचा त्रास अनेक चाकरमान्यांना होतो. खड्ड्यांमुळे कामाच्या किंवा महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचायला उशीर होतो.

रस्त्यावरील या खड्ड्यांचा त्रास सामान्य नागरिकांसह अनेक कलाकार मंडळींनाही होत असतो आणि या खड्ड्यांच्या समस्येबद्दल अनेक कलाकार मंडळी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. अशातच मराठी अभिनेता अजिंक्य राऊत यानेही खड्ड्यांबद्दलची पोस्ट शेअर केली आहे.

खड्ड्यांमुळे अभिनेत्याला उशीर झाला आणि यामुळे त्याचे विमान सुटल्याचे त्याने या पोस्टमधून म्हटलं आहे. अजिंक्यने त्याच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे आणि या स्टोरीद्वारे त्याने खड्ड्यांची समस्या आणि त्या खड्ड्यांमुळे झालेला उशीर याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

अजिंक्य राऊतने शेअर केलेल्या या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये असं म्हटलंय, “नवीन बनवलेल्या रस्त्यांवरही खूप खड्डे पडले आहेत. ठाण्याहून मुंबई विमानतळावर पोहोचण्यासाठी मला साडेतीन तास लागले. वाहतूक समस्या आणि खराब रस्ते… यामुळे माझं विमान सुटलं.”

अजिंक्य राऊत इन्स्टाग्राम स्टोरी
अजिंक्य राऊत इन्स्टाग्राम स्टोरी

यानंतर त्याने आणखी एक स्टोरी पोस्ट करत “आता माझे दुसरे विमान पाच तासांनी आहे” असं सांगितलं. दरम्यान, अजिंक्य हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असतो. त्याच्या या फोटो आणि व्हिडीओला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसादही मिळताना दिसतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचबरोबर अभिनेता काही महत्वाच्या विषयांवरही सोशल मीडियाचा वापर करत आपलं मत व्यक्त करताना दिसतो. अजिंक्यच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘मन उडू उडू झालं’, ‘विठु माऊली’ आणि ‘अजब प्रीतीची गजब कहाणी’ या मालिकांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर त्याने काही चित्रपटांमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.