मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून अंशुमन विचारेला ओळखले जाते. ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ कार्यक्रमातून अंशुमन घराघरांत पोहोचला. आपल्या अभिनयाच्या जोरावर अंशुमनने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर अंशुमन मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. अंशुमन हा त्याची लेक अन्वी व पत्नी पल्लवीबरोबरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत असतो. दरम्यान, नुकत्याच एका मुलाखतीत अंशुमन व त्याच्या पत्नी पल्लवीने त्यांच्या लग्नाबाबतचा एक किस्सा सांगितला आहे.

अलीकडेच अंशुमन व पल्लवीने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअरबरोबर वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहे. दरम्यान, या मुलाखतीत पल्लवीने तिचे व अंशुमनचे लग्न कसे झाले याबाबतचा खुलासा केला आहे.

पल्लवी म्हणाली, “माझी एलएलबीची परीक्षा चालू होती. शेवटचा पेपर झाला आणि मी माझ्या घरी सांगितलं. ५ जूनला आमचं लग्न होतं आणि मी १ जूनला घरी सांगितलं की, मी लग्न करतेय. माझ्या घरी लग्नाबद्दल काहीही माहीत नव्हतं; पण आमचं ठरलं होतं. सुधाकर चव्हाण म्हणून अंशुमनचे मित्र होते. मला ते वडिलांसारखे होते. त्यांनीच आमचं लग्न लावून दिलं. त्यांनी आम्हाला मानसिक, आर्थिक मदत केली होती.”

पल्लवी म्हणाली, “मी लग्नाची सगळी खरेदी एका ऑनलाइन अॅपवरून केली होती. परीक्षेचा अभ्यास करता करता, मी लग्नाच्या साड्यांची खरेदी केली होती. पाच हजारांत मी तीन साड्या घेतल्या होत्या. माझ्याकडे सोन्याचे दागिने नव्हते. ठाणे रेल्वेस्थानकावर फिरून मी ५०० रुपयांचे गळ्यातले, २०० रुपयांचे कानांतले खरेदी केले होते. सहा ते सात हजार रुपयांत मी लग्नाची खरेदी केली होती. लग्नातही मी मेकअप वगैरे काहीही केलेला नव्हता.”

हेही वाचा- Video: हर्षवर्धनच्या नव्या डावावर विश्वास ठेवून सागर सईला देतो वाईट वागणूक अन् मग मुक्ता…, नक्की काय घडतं? वाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंशुमन विचारेच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर मालिका, नाटक, चित्रपटांमधून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आला आहे. ‘श्वास’, ‘पोस्टर बॉईज’, ‘विठ्ठला’, ​’शप्पथ’​ चित्रपटांमधील त्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. ‘फू बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसारख्या विनोदी कार्यक्रमांमधून त्याने प्रेक्षकांना खळखळवून हसवले. अभिनयाबरोबरच अंशुमन उत्तम गायकदेखील आहे. ‘मोर्चा’ चित्रपटाद्वारे त्याने गायनाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. ‘सिंगिंग स्टार’ कार्यक्रमात तो झळकला होता.