‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘चला हवा येऊ द्या.’ या कार्यक्रमाने १० वर्षे प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम केलं. या कार्यक्रमामुळे कुशल बद्रिके घराघरात पोहोचला. कुशलने आपल्या विनोदाच्या अचूक टाइमिंगच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये त्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. तसंच त्याने मराठीसह हिंदीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अशा या हरहुन्नरी अभिनेत्याने सोशल मीडियावर नुकतीच बायकोसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आज कुशल बद्रिके आणि सुनयना बद्रिके यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने बायकोला शुभेच्छा देण्यासाठी कुशलने खास पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्याने बायकोबरोबरचे काही फोटो पोस्ट करत लिहिलं आहे, “Happy लग्नाचा वाढदिवस. आधी माझ्याकडे जराही संयम नव्हते पण मग माझं लग्न झालं, आता मी भयंकर संयमी आहे. आधी मला कायम माझ्या दिसण्यावर न्यूनगंड होता. पण ‘सुनयना’, तुझ्याबरोबर लग्न झालं आणि एका वाक्यात तू माझा गैरसमज दूर केलास ते वाक्य म्हणजे “थोबाड पाहिलस का आरश्यात.” लग्नापर्यंत मी कधीही उपवास केला नव्हता. पण लग्नानंतर मात्र हे उपवासाचं पुण्य मला नेहमी लाभतं, माझे मित्र jealousy ने त्याला उपासमार म्हणतात ते जाऊद्या.”
पुढे कुशलने लिहिलं, “शाळेत असताना परिसर अभ्यास मध्ये स्वावलंबनाचे धडे वाचले होते. ते सगळे लग्नानंतर कामाला आले. शाळेत स्काऊट मध्ये हट्टाने गेलो होतो, तिथे शिकलो की “खडतर परिस्थितीतही न डगमगता आयुष्याशी लढा द्यायला हवा.” हल्ली मला ती गोष्ट फार-फार कामी येते. माझ्या आईने माझ्या लहानपणी मला खूप बदडबदड बदडलंय, खरंतर बुकलून काढलंय, पुढे माझ्या बायकोने माझं बालपण आई सारखचं छान जपलं. शेवटी बायकोला अनंत काळाची माता म्हणतात ते काय उगीच!”
“असो, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आजच माझी बायको कार्यक्रमाच्या निमित्ताने परदेशात जात आहे. हे म्हणजे बर्थडे दोघांचा पण गिफ्ट मला एकट्यालाच असं झालं आहे! त्यामुळे माझं आभाळ आज बायको पेक्षाही ठेंगणं झालं आहे.- सुकून”, असं कुशल बद्रिकेने लिहिलं आहे.
कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. समिरा गुजरने प्रतिक्रिया देत लिहिलं की, अरे ए…ती प्रवासाच्या गडबडीत वाचणार नाही…म्हणून एवढं. विजू माने म्हणाले, “चालायचंच कुशा..असो..शुभेच्छा.” तसंच चाहत्यांनी कुशल व सुनयनाने लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.