मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. सध्या तो ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाच्या दौऱ्यावर आहे. याच दरम्यान तो सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करताना दिसतो. त्याच्या इन्स्टाग्राम पोस्ट तर अनेकदा चर्चेत असतात. आताही असंच काहीसं घडलं आहे. संकर्षणने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.

संकर्षण नुकताच ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाच्या दौऱ्यासाठी रत्नागिरीला गेला होता. त्यावेळी त्याला तिथे आलेला अनुभव त्याने या पोस्टमधून चाहत्यांशी शेअर केला आहे. या पोस्टसह संकर्षणने काही फोटोही शेअर केले आहेत. संकर्षणची ही पोस्ट सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
आणखी वाचा-“बाबा तिथेच सतरंजी टाकून झोपतात कारण…” संकर्षण कऱ्हाडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“बाबा, काळजी करु नका.. गणपती मला स्वत: घ्यायला येईल..”

“मी परवा मुंबईहून नाटकाच्या कोकण दौऱ्यासाठी निघताना घरात सहज म्हणालो कि , रत्नागीरीहून २.३० तासावर गणपतीपुळे आहे.. दर्शनाला जाउन येईन. तेव्हा बाबा काळजीने म्हणाले कि, का धावपळ करतोस..? वेळ मिळालाय तर दिवसभर आराम कर.. त्यात तू जाणार कसा ..? प्रवासाचं काय नियोजन ..? हे विचारल्यावर मी अगदी सहज थाटात म्हणालो, “बाबा काळजी करु नका.. मला गणपती स्वत: घ्यायला येईल..” आणि घरुन निघालो…

काल रात्री रत्नागिरीच्या प्रयोगाला गणपतीपुळे देवस्थानचे पुजारी श्री. उमेश घनवटकर प्रसादाचे उकडीचे मोदक घेउन आले.. मला म्हणाले चला दर्शनाला गाडी घेउनच आलोय.. मी म्हणालो पण माझं काही तशी तयारी नाहीये.. शिवाय आमची राहायची सोय चिपळूनला आहे.. तेव्हा ते म्हणाले रहायची, दर्शनाची, जेवणाची सगळी सोय, नियोजन मी करतो.. तुम्ही फक्त गाडीत बसा आणि चला.. मला माझंच स्वत:चं वाक्यं आठवलं “बाबा काळजी करु नका.. मला गणपती स्वत: घ्यायला येईल..” मी रत्नागिरीच्या प्रयोगानंतर त्यांच्या गाडीत बसलो तर अर्थातच समोर गणरायाचा छानसा फोटो.. काल मध्यरात्री सुखरूप इथे पोचलो.. राहाण्याची उत्तम सोय त्यांनीच केली… आज सकाळी त्यांनीच मला सोवळं दिलं.. दर्शनाला घेउन गेले.. माझ्या हातून बाप्पाचा अभिषेक केला आणि मनसोक्तं खायला घातलं…

मी तुम्हाला कसा सांगू ह्या प्रत्येक क्षणांत मला असं वाटत होतं कि, हे सगळं गणपती मी उच्चारलेल्या त्या एका वाक्यासाठी माझ्याकडून करवून घेतोय.. माझी आई मला माझ्या लहानपणापासून सांगत आलीये कि, “बोलतांना कायम चांगलं बोलावं ..” मी उच्चारलेल्या त्या एका चांगल्या वाक्यासाठी गणपती बाप्पा ने माझ्यासाठी काय काय केलं… मी खूप भारावून गेलोय.. बाप्पा मोरया…”

दरम्यान संकर्षण कऱ्हाडेच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहे. तसेच त्याची ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे. सध्या तो मालिका आणि नाटक यामध्ये व्यस्त आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत त्याने यशचा मित्र समीर ही भूमिका साकरली आहे. या मालिकेचं शूटिंग, नाटकाचे प्रयोग, परदेशातील नाटकाचे दौरे यातून वेळात वेळ काढून तो चाहत्यांसाठी विविध पोस्ट करताना दिसतो.