Shantanu Gangane on delay of payments: ‘पारू’ मालिकेतील सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. मालिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्ट आणि व्हिडीओ यांमुळेही हे कलाकार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात.
आता या मालिकेत मोहन या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेता शंतनू गंगणे याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करीत मालिकाविश्वात काम करणाऱ्या कलाकारांना वेळेवर मानधन मिळत नसल्याबद्दल वक्तव्य केले होते. आता एका मुलाखतीत त्याने यावर भाष्य केले आहे.
‘पारू’ मालिकेचा आणि ‘त्या’ व्हिडीओचा काहीही संबंध नाही
शंतनू गंगणेने नुकताच ‘सेलिब्रिटी कट्टा’शी संवाद साधला. यावेळी अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओचा आणि पारू मालिकेचा काही संबंध आहे का? याबाबत वक्तव्य केले. शंतनू म्हणाला, “सगळ्यांचा गैरसमज झाला होता की, मी फक्त ‘पारू’मालिके बद्दल बोलतोय; पण तसं नव्हतं.”
“त्या मालिकेत काम करत असताना माझे सगळे पैसे मिळाले आहेत. तिथे थोडा वेळ लागतो; पण पैसे मिळाले आहेत. मी अभिनेता म्हणून तिथे दिसतो. त्यामुळे मी ‘पारू’ मालिकेबद्दल बोलतोय, असं सगळ्यांना वाटलं; तर तसं नाहीये.”
पुढे अभिनेता म्हणाला की, इंडस्ट्रीमध्ये असेही काही निर्माते आहेत, जे वर्षानुवर्षं उत्तम पद्धतीनं, प्रामाणिकपणे काम करतात. सांगितल्याप्रमाणे कलाकारांना तारखा देणं, वेळेवर मानधन देणं हे ते करतात. खूप निर्माते आहेत असे आहेत, जे स्वत: कलाकारांना फोन करून सांगतात की, तुझं पेमेंट तयार आहे. एक-दोन दिवस उशीर होणार असेल, तर तसंही सांगितलं जातं. असे चांगले निर्मातेदेखील आहेत. आता या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी कोणाचंही नाव घेणार नाही. कारण- लोकांना असं वाटेल की, अमुक एखाद्या व्यक्तीची बाजू घेत आहे.
“मला कोणाचं नाव खराब करायचं नाही”
“मी याआधी ज्यांची नावं घेतली, ते माझे मित्र होते. एक वेळ अशी आली जेव्हा मला वाटलं की, माझे मित्र व्यावसायिक आयुष्यात असं वागत आहेत, त्यामुळे माझी चिडचिड झाली. त्यामुळे मला त्यांचं नाव घ्यावं लागलं. कारण- उगाचच एका निर्मात्याचं नाव घेतलं जाऊ लागलं. मी शेअर केलेल्या सोशल मीडियाच्या पोस्टनंतर त्यांना असं वाटलंच नाही की, ते आपल्याबद्दल आहे. ते त्यांना कळलं नाही. म्हणून मला उघडपणे नावं घ्यावी लागली. पण, त्यानंतर मी ठरवलं आहे की, कोणाची नावं घ्यायची नाहीत. मला कोणाचं नाव खराब करायचं नाही.
“जे चांगलं करीत आहेत, त्यांच्याबद्दल मी सोशल मीडियावर लिहिलं आहे. ज्यांनी दिले नाहीत, त्यांच्याबद्दल चॅनेलमध्ये ईमेल करून मी माझे पैसे वसूल केले आहेत. यावेळी उघडपणे करायचं. कारण- हे सगळं वर्षानुवर्षे चालूच आहे. काही अपवाद असतात. आपण समजू शकतो. जेव्हा आपण टीम म्हणून काम करतो. निर्माता हा आपला कॅप्टन असतो. तो लाखांचा पोशिंदा असतो. त्याला मदत करायला आपण सगळेच तयार असतो. कारण- तो जगला, टिकला, तर आम्हाला मिळणार आहे.
“सुरुवातीचे काही महिने आपण समजू शकतो. अपवाद असतो, एखाद-दुसरा महिना मागे-पुढे झाला, तर अगदी साहजिक आहे. पण जेव्हा अपवादाचा नियम होतो की, आपण ९० दिवसांबाबत आपली बोलणी झाली आहेत. पण अडचण आहे, १२० दिवस मानधन देऊ शकत नाही. हा नियम झाला. मग हे गृहीत धरणं झालं.”
“आर्थिकदृष्ट्या अडचण फक्त निर्मात्यालाच आहे का?”
अभिनेता पुढे म्हणाला की, आर्थिकदृष्ट्या अडचण फक्त निर्मात्यालाच आहे का? मी म्हणतो की, त्यांना अडचण आहे. आम्ही त्यांची बाजू समजून घेतो. पण त्यांनी त्यांच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या कमी असलेली माणसं त्यांच्यावर विसंबून आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे. निर्माते सुरुवातीला कलाकारांना हे सांगतात का तुमचे अमुक इतके पैसे ठरले आहेत. जर फायदा झाला, तर तुम्हाला अमुक इतके टक्के देतो, असं ते म्हणतात का? किंवा हे सांगतात की, जर नुकसान झालं, तर एवढे पैसे वसूल करून घेईन.
यातील कुठलीही गोष्ट सांगितली जात नाही. जर तुमच्या फायद्यामध्ये तुमची टीम नाही. तर तुमच्या नुकसानीमध्ये का? अपघात खूप होतात. अचानक मालिका होतात. मी सगळं समजू शकतो. पण, त्याची जबाबदारी फक्त कलाकारांची का? तंत्रज्ञांची का?
“…तर कोणाला राग येण्याचं कारण नाही”
“कामाची १२ तासांची शिफ्ट असते. ती गृहीत धरली गेली की, १३ तासांची करायची. आम्ही कलाकार सगळे त्यासाठी तयार आहोत. आतापर्यंत कोणी म्हणालं नाही की, आम्हाला फक्त इतकाच वेळ काम करायचं आहे. सगळे आनंदानं काम करतात. एवढं काम केल्यानंतर मग का कोणी ठरलेल्या वेळेपेक्षा मानधनासाठी जास्त थांबायचं? ही अडचण नाही का? यावर कोणी बोललं, तर तर कोणाला राग येण्याचं कारण नाही. यातून मार्ग काढला पाहिजे. सगळ्यांनी मिळून मार्ग काढला पाहिजे. आतापर्यंत सगळ्यांनी सहकार्य केलंच आहे.
“अनेक जणांचे असे अनुभव आहेत की, मालिका बंद झाल्यानंतर निर्मात्यांनी फोन उचलणं बंद केलं. त्यांनी सरळ सांगितलं की, माझं नुकसान झालंय. मी पैसे देणार नाही. जे कलाकार तरुण आहेत, ज्यांचं घर फक्त त्यांच्या कमाईवर चाललं. त्यांनी एवढं नुकसान कसं सहन करायचं?
“५-६ हजाराची म्हणजे दहा हजाराच्या आतील रक्कम जेव्हा अडवली जाते, त्याचा निर्मात्याना काही फरक पडत नाही. पण, त्या कलाकारासाठी ते १० हजार खूप महत्वाचे असतात. माझ्याकडे ती यादी आहे. एका-एका प्रोजेक्टचे पाच लाखांच्या घरात पैसे अडकले होते. या रकमेचा त्या कलाकारावर काही फरक पडणार नाही का? त्याने मेहनत करताना काही काही कामचुकारपणा केला आहे का? निर्मात्यांचं नुकसान होतं, म्हणून कलाकारांचं नुकसान करणं, चुकीचं आहे. त्यासाठी आर्थिक नियोजन करणं गरजेचं होतं.”
दरम्यान, अभिनेत्याने विविध मालिकांमध्ये काम करीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.