Marathi Actor Swapnil Rajshekhar : आपल्या मुलांना आयुष्यात भरभरून यश मिळावं, त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. आज लोकप्रिय मराठी अभिनेत्याची हीच इच्छा पूर्ण झालेली आहे. लाडकी लेक महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

विविध मालिका व सिनेमांमधून घराघरांत लोकप्रिय झालेले अभिनेते म्हणजेच स्वप्नील राजशेखर. गेली दोन वर्षे ते ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत चारुहास ही भूमिका साकारत होते. आज स्वप्नील राजशेखर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या मुलीबद्दलची आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली आहे.

स्वप्नील राजशेखर यांची कन्या कृष्णा राजशेखर युजीसीची नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. कृष्णा सुद्धा अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या मल्टिटॅलेंटेड लेकीसाठी स्वप्नील राजशेखर यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

स्वप्नील राजशेखर यांची लेकीसाठी खास पोस्ट

मैत्र हो, सुहृद हो…
एक आनंदवार्ता..

माझी कन्या कृष्णा (krushna rajshekhar) ही इंग्रजी विषयात UGC NET आणि SET या राष्ट्रीय व राज्यस्तरीय दोन्ही कठीण परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाली…

दोन नाटकांचे प्रयोग, ऑडियो इंडस्ट्रीमधले प्रोजेक्टस, सोशल मीडिया प्रमोशन्स, अभिनय क्षेत्रातील उमेदवारी आणि बापाची फुल टाईम ॲटेंडंट या सगळ्या जबाबदाऱ्या नीट सांभाळून…
बरं, कथक विशारद आहे, जर्मन भाषेचा अभ्यास सुरु आहेच… जर्मनीत जाऊनही शिकलीय….

आता phD साठी प्रवेश घेतला आहे…

आपली पोर हुशार आणि सिन्सिअर असणं हे बापासाठी, संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी आहे…

पण तरी मी पोरीला सल्ला दिला, म्हटलं
“दमानं गं… पणजोबा, आजोबा, बाप… सगळ्यांच्या वाट्याचं तु एकटीच शिकतेयस का काय ?!!!”

तशी हुशारी, कलागुण पूर्वापार आमच्यात आहेत… पण चिकाटी, सिन्सिॲरीटी, ध्येयासक्ती तिच्या आजी आणि आईकडून तिच्यात आलीय…
आणि ‘स्त्री’ असल्याने पोर जन्मजात अष्टावधानी, जबाबदार, सक्षम आहेच..
असं सगळं…
तर असं घराव लायटींग…

दरम्यान, स्वप्नील राजशेखर यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिषेक रहाळकर, अभिजीत श्वेतचंद्र यांनी कमेंट्स करत कृष्णाचं कौतुक केलं आहे. याशिवाय चाहत्यांनी सुद्धा पुढील वाटचालीसाठी कृष्णाला शुभेच्छा दिल्या आहेत.