Marathi Actor Tushar Ghadigaonkar Suicide: मराठी अभिनयविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक तुषार घाडीगांवकरचे निधन झाले आहे. तुषारने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तुषारच्या निधनाच्या बातमीने कलाकार व चाहत्यांना धक्का बसला आहे.
अभिनेता अंकुर वाढवेने तुषार घाडीगांवकरच्या निधनासंदर्भात इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. तुषारच्या आत्महत्येमुळे अंकुरला धक्का बसला आहे, आत्महत्या हा पर्याय नसल्याचं त्याने लिहिलं आहे. अंकुरने तुषारचा एक फोटो पोस्ट करून भावुक कॅप्शन दिलं आहे. “मित्रा का? कशासाठी? कामं येतात जातात, आपण मार्ग काढले पाहिजे पण आत्महत्या हा मार्ग नाही! मान्य आहे सध्याची परिस्थिती विचित्र आहे पण हा निर्णय नाही होऊ शकत. तुषार घाडीगांवकर तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो,” असं अंकुरने तुषारचा फोटो शेअर करून लिहिलं.
तुषारच्या निधनाची बातमी आल्यानंतर मराठी इंडस्ट्रीतील कलाकार व चाहते त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. अंकुरने केलेल्या पोस्टवरून तुषारने काम मिळत नसल्याने आत्महत्या केली, असं समजतंय.
अंकुर वाढवेची पोस्ट –
तुषारने इंडस्ट्रीत बरंच काम केलं होतं. ‘मन कस्तुरी रे’, ‘लवंगी मिरची’, ‘भाऊबळी’, ‘उनाड’, ‘हे मन बावरे’, ‘झोंबिवली संगीत बिबट’ या कलाकृतींमध्ये तुषारने काम केलं होतं. आपल्या अभिनयाची छाप सर्वांवर सोडणारा तुषार कणकवलीचा होता. नाटकातून आपल्या अभिनयाची सुरुवात करणाऱ्या तुषारने नंतर मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केलं.