Marathi Actress Went To Kokan With Husband : गौरी-गणपतीच्या सणाला यंदा अनेक मराठी कलाकार कोकणात गेल्याचं पाहायला मिळालं. छाया कदम, निखिल बने, तितीक्षा व खुशबू तावडे, तन्वी मुंडले, अंशुमन विचारे असे अनेक सेलिब्रिटी आपल्या मूळ गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गेले होते. ‘प्रेमाची गोष्ट’, ‘कन्यादान’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री सुद्धा गणेशोत्सवानिमित्त कोकणात आपल्या माहेरी गेली होती. यावेळी तिने खास नवऱ्यासह रत्नागिरी गाठलं होतं.

गेले अनेक महिने नवऱ्याला कोकण फिरवायचं होतं अखेर माझ्या घोवाला कोकण दाखवायची वेळ गणेशोत्सवात आली, असं म्हणत या अभिनेत्रीने इनस्टाग्रामवर खास व्हिडीओ शेअर केला आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे अमृता बने. एप्रिल २०२४ मध्ये शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांचा विवाहसोहळा पार पडला होता.

‘कन्यादान’ मालिकेत अमृता आणि शुभंकर या दोघांनी एकत्र काम केलं होतं. अमृता मुंबईची आहे तर, शुभंकर पुण्याचा…त्यामुळे लग्नानंतर अभिनेत्याला सगळे चाहते प्रेमाने ‘मुंबईचा जावई ‘असं म्हणू लागले. पण, शुभंकर मूळ रत्नागिरीचा जावई आहे कारण, अमृताचं मूळ गाव रत्नागिरीतील निरुळ येथे आहे असं अभिनेत्रीने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

अमृता म्हणते, “माझ्या घोवाला कोकण दाखवा’… एक पुणेकर ते मुंबईचा जावई हे तो अनुभवतोच आहे. मात्र, माझं मूळ गाव कोकणात आहे. आता रत्नागिरीच्या जावयाचा मान काय असतो ते दाखवलं नाही आणि त्याला कोकण फिरवलं नाही तर काय उपयोग? असं म्हणतात प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ यावी लागते आणि माझ्या घोवाला कोकण फिरवण्याची योग्य वेळ आली ती गणपतीत. आहा…कोकणातले गणेशोत्सव…घरच्या बाप्पाला टाइमप्लीज म्हणून आम्ही निघालो कोकणात. रत्नागिरीत उतरल्यावर कडकडून भूक लागली होती. मग काय…रत्नागिरीच्या स्टॅण्डवरच्या मिसळ पावचा आणि गरमागरम वड्यांचा आस्वाद घेतला.”

“लहान असताना रत्नागिरीहून निरुळ गावी जाताना कधी एकदा भाटे बीच दिसतोय असं व्हायचं आणि ती आठवण मी प्रवासादरम्यान आवर्जून शुभंकरला सांगितली. पाऊस असल्याने जिकडे पाहावं तिथे स्वर्गच दिसत होता. गावी येऊन अनेक जुन्या आठवणी ताज्या झाल्या. अखेर आम्ही आमच्या घरी पोहोचलो आणि त्यानंतर थेट गेलो पाटावर ( नैसर्गिक पाण्याचे पाट )….एकंदर आम्ही दोघांनीही खूप मजा केली.” असं अमृताने या व्हिडीओमध्ये सांगितलं.

अमृताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गावचा गणेशोत्सव, सुंदर निरुळ गाव, बाप्पाती आरती, भजन आणि कोकणातील निसर्गरम्य परिसराची झलक पाहायला मिळत आहे.