रायगड येथील इर्शाळवाडीच्या येथे घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. एनडीआरएफ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक घरे दबली गेल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. अनेक स्तरातून या दुर्घटनेवर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेत्री जुई गडकरीने या दुर्घटनेवर एक पोस्ट शेअर केली आहे.
इर्शाळगडाच्या पायथ्याशी ही वाडी आहे. येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे मानवली गावातून पायी चालत जावं लागतं. वाडीत ४८ कुटुंबं वास्तव्यास असून तिथली लोकसंख्या २२८ इतकी आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात इथे बचावकार्य सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. या दुर्घटनेनंतर अभिनेत्री जुईने पूर्वी इर्शाळवाडीला फिरायला गेल्यानंतरचा अनुभव सांगितला आहे.
हेही वाचा- अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने दिली प्रेमाची कबुली; होणाऱ्या पतीचा फोटो शेअर करत म्हणाली…
जुईने केलेली पोस्ट
ईर्शाळगडावर गेलो तेव्हाच्या काही आठवणी… सकाळपासुन ईर्शाळवाडी वर दरड कोसळल्याची बातमी बघतेय आणि डोकं सुन्नं झालय… तिथल्या आऊच्या हातचा स्वयंपाक अजुनही आठवतोय… एव्हढ्या ऊंचावर असलेली ठाकरवाडी… विज नाही.. मेडीकल, जिवनावश्यक वस्तु असं वरती ठकरवाडीत काहीच नाही.. तरीही सदैव चेहरा हसरा… कसं काय जमतं त्यांना? प्रत्येक वेळेला १-१.३० तास चढुन वर जाणं किती अवघड ए… पण तरीही कसलीही complaint नं करता खुप कष्टं करुन मानाने जगतात ही ठाकरं… माझ्या खुप जवळचा विषय आहे ठाकरं आणि ठाकरवाड्या… कितीतरी वाड्यांवर मी फिरलिये… त्यांच्या हातचं चविष्ठं जेवलिये… बातमी बघुन खुप वाईट वाटलं… सगळे सुखरुप असुदेत..
रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी दरड कोसळली. चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. या वाडीतील घरांवर दरड कोसळल्याने अनेक घरे खाली दबली गेली आहेत. तसेच यामध्ये १०० हून अधिक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई अग्निशमन दल आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरु आहे.