Kishori Shahane on Son Name: अभिनेत्री किशोरी शहाणे या त्यांच्या विविध धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखल्या जातात. मराठी-हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम करत त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता मात्र त्या त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत.
किशोरी शहाणेंनी मुलाचं नाव बॉबी असं का ठेवलं?
किशोरी शहाणे व त्यांचा मुलगा बॉबी विज यांनी काही दिवसांपूर्वी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत किशोरी शहाणेंनी मुलाचे नाव बॉबी असे का ठेवले याचा खुलासा केला. किशोरी शहाणे म्हणाल्या, “त्यावेळी खूप खोलवर विचार केला होता. दीपक पंजाबी, मी मराठी, सासू बंगाली, माझ्या ज्या नणंदा आल्या होत्या सरदारणी होत्या. दीपकचं म्हणणं असं होतं की, आपल्या मुलाचं नाव आपण असं ठेऊयात, ज्यामुळे त्याचा धर्म कळणार नाही; तो कुठेही फिरेल तर लोक त्याला बॉबी म्हणून ओळखतील.”
“बॉबी असं नाव आहे, ज्यामधून तो हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन की सरदार आहे, असं काही कळत नाही. म्हणून आमचं बॉबी हे नाव आधीच ठरलं होतं. जे बाळ होईल, मुलगा होईल किंवा मुलगी त्याचं नाव बॉबी ठेवायचं असं आम्ही ठरवलं होतं. इतकं साधं होतं. असे म्हणत किशोरी शहाणे यांनी त्यांच्या मुलाचे नाव बॉबी का ठेवले, याचा खुलासा केला.
याच मुलाखतीत किशोरी शहाणेंनी त्यांचा मुलगा बॉबीला कोणत्याही वाईट सवयी नसल्याचे म्हटले. सध्या त्याचे करिअरवर लक्ष केंद्रित आहे. तो जर पार्टीला जात असेल तरीदेखील घरातून जेवण करून जातो, असा खुलासा केला.
बॉबीने बालकलाकार म्हणून काम केले आहे. तसेच अभिनय क्षेत्रात काम करण्याबाबत तो म्हणाला की, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनयात करिअर करण्याचा मी निर्णय घेतला. त्यानंतर मी असिस्टंट डायरेक्टर म्हणून जाहिरातीत काम केले आहे. एडिटिंग रूममध्येसुद्धा असिस्टंट म्हणून काम केलं आहे. कास्टिंगदेखील केले आहे. साऊंड रेकॉर्डिंग रुम, डबिंग स्टुडिओ अशा सगळ्यात मी असिस्टंट म्हणून काम केले आहे.
याच मुलाखतीत नेपोटिझम, बॉबीचे बालपण, आई-वडिलांच्या स्टरडमचा त्याच्यावर काही परिणाम झाला का, अशा अनेक विषयांवर किशोरी शहाणे व त्यांचा मुलगा बॉबी विज यांनी वक्तव्य केले आहे.