कलाविश्वात काम करताना अनेक कलाकारांना चांगले-वाईट प्रसंग येत असतात. अभिनेत्रींच्या वाटेला येणारे असे वाईट प्रसंग अधिकच असतात. काही सेलिब्रिटींना इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचसारख्या घटनांनाही सामोरं जावं लागलं आहे. याबद्दल अनेक अभिनेत्री आता पुढे येऊन मुलाखतींमधून त्यांच्याबरोबरचे प्रसंग सांगतात. अशातच टेलीव्हिजनवरील एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिचा नोकरीमधला वाईट प्रसंग सांगितला आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून शालिनी म्हणून घराघरांत लोकप्रिय झालेली खलनायिका म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकरने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्याबरोबरच्या वाईट अनुभवाबद्दल सांगितलं. कांचन धर्माधिकारी यांच्या ‘बातों बातों में’ या युट्यूब वाहिनीशी साधलेल्या संवादात माधवीने नोकरी करत असताना तिच्याबरोबर घडलेला वाईट अनुभव शेअर केला.

याबद्दल माधवी म्हणाली, “माझी सख्खी मावस बहीण सोनाली खरे याच इंडस्ट्रीत काम करत आहे. ती मला सिनिअर आहे. तिच्याकडे बघून मला असं वाटायचं की, ताई जे करत आहे, तेच मला पण करायचं आहे. ती डोंबिवलीला राहायची तेव्हा सुट्टीमध्ये मी तिच्याबरोबर शूटिंग बघायला जायचे. तिची धावपळ आणि तो संघर्ष मी जवळून पाहिलं आहे. त्यावर मी आईला म्हणाले होते की, आई मलासुद्धा असंच काहीतरी करायचं आहे.”

यापुढे ती म्हणाली, “मग एक दिवस असा आला की, आई म्हणाली तुझी एवढीच इच्छा आहे ना मग कर तू. पण आम्हाला तुला आर्थिकदृष्ट्या मदत करता येणार नाही. आम्ही मानसिक बळ देऊ. मग सुरुवात करायची म्हटलं तर राहणार कुठे? तर माझी सख्खी मावस बहीण अलका साठ्ये ही गोरेगाव स्टेशनजवळ राहायची. त्यामुळे मी तिच्याकडे रहायला गेले.”

यानंतर माधवी म्हणाली, “तेव्हा सुरुवातीला स्ट्रगलसाठी पैसे नव्हते. त्यामुळे माझ्या भाचीने मला समोरच्याच एका बिल्डींगमध्ये कामाला लावलं. तिथे मला एक वाईट अनुभव आला. एखादी मुलगी गरीब घरातली आहे, दिसायला जरा ठीक आहे असं त्या बॉसला वाटलं असावं. तो हिंदी भाषिक होता. सुरुवातीला त्याच्या बोलण्यामधून यायचं की, तुझे वडील आता म्हातारे होत चाललेत. तुझ्या वडिलांसाठी मी घर घेऊन देईन, त्यांना मी सांभाळेन, त्यांना मुंबईत शिफ्ट करेन.”

यापुढे माधवीने सांगितलं, “सुरुवातीला मला हे कळायचं नाही. खोपोलीसारख्या गावाच्या ठिकाणाहून मी थेट मुंबईत आली होती. त्यामुळे मी बावळट होते, विसरभोळी होते. मी खंबीर नव्हते. घाबरायचे. ज्यावेळी मला त्या माणसाच्या स्पर्शामध्ये कळलं; तेव्हा मी खूप घाबरले. मग महिनाभर काम केल्यानंतर त्याचं एक वेगळं रूप माझ्यासमोर आलं. त्याक्षणी मी नोकरी सोडली.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर ती म्हणाली, “मी तेव्हा ठरवलं की, मला ही नोकरी करायची नाही. त्यावर तो बॉस ‘मला नोकरी सोडली तर तुला पैसे कसे मिळणार? तुझं पुढे काय होणार?’ असं म्हणत होता. पण त्यावर मी माझं काय ते बघेन, धन्यवाद असं म्हटलं आणि एक-दीड महिन्याचे जे काय पैसे घेतले होते ते घेतले आणि ती नोकरी सोडली.”